संपूर्ण भारतीय संघाचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह; तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज


सिडनी – ऑस्ट्रेलियासोबत तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज असलेल्या संपूर्ण भारतीय संघाचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला असून बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. मेलबर्नमधील रेस्तराँमध्ये कोरोनासंबंधित नियमांचे उल्लंघन करताना रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी दिसल्यानंतर वाद निर्माण झाला होता. भारतीय संघाला यामुळे कोरोना संकटाचा सामना करावा लागतो का काय? अशी शंका निर्माण झाली होती.

भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांची ३ जानेवारीला कोरोना चाचणी करण्यात आली. सर्व चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली. एकीकडे कोरोना नियमांचे उल्लंघन खेळाडूंनी केल्यामुळे ऑस्ट्रेलियामधील मीडिया लक्ष्य करत असताना भारतीय संघाने मात्र संपूर्ण लक्ष सिडनीमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याकडे केंद्रीत केले होते. सिडनीमध्ये ७ जानेवारीपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघासाठी प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या चिंतेची बाब नसून कोणतीही उणीव तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीमध्ये ठेवली जात नाही आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघ सध्या प्रत्येकी एक सामना जिंकत बरोबरीत आहेत. मैदानाबाहेर बाहेर कोण काय बोलत आहे याकडे भारतीय खेळाडूंनी लक्ष देणे टाळले आहे. कोणताही नियम तोडला नाही यावर आम्ही ठाम असून आम्ही सध्या तिसऱ्या सामन्यावर लक्ष्य केंद्रीत करत आहोत. २-१ ने आघाडी घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्राने दिली.

रोहित शर्मा, सलामीवीर शुभमन गिल, यष्टिरक्षक ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि फलंदाज पृथ्वी शॉ यांच्यावर कोरोनासंबंधित नियमांचा भंग केल्याचा आरोप आहे. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडून या प्रकरणी चौकशी सुरु असली तरी पाच खेळाडूंना संघासोबत प्रवासाला मनाई करण्यात आलेली नाही. नवदीप सिंग या चाहत्याने ‘ट्विटर’वर भारतीय संघातील पाच खेळाडूंसोबतची चित्रफित टाकल्यानंतर शनिवारी हा वाद निर्माण झाल्यानंतर ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) साथीने संयुक्त चौकशी करीत असल्याचे घोषित केले.

खेळाडूंच्या भोजनाचे पैसेही नवदीपने भरल्याचा दावा करत त्यासंबंधीची पावती ‘ट्विटर’वर टाकली होती. याचप्रमाणे पंतने निघताना आपल्याला अलिंगन दिल्याचेही त्याने म्हटले आहे. ही चित्रफित आणि पावती समाजमाध्यमांवर या व्यक्तीने परवानगी न घेताच टाकल्यामुळे हा वाद निर्माण झाला.