मुंबई – सीबीआय स्पेशल कोर्टाने आज गँगस्टर छोटा राजनला दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने ही शिक्षा पनवेल येथील बिल्डर नंदू वाजेकर यांना धमकावून 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल खटल्यात ठोठावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नंदू वाजेकर यांनी सन 2015 मध्ये पुणे येथे एक जमीन भूखंड खरेदी केला होता. एजंट परमानंद ठक्कर (जो सध्या फरार आहे) याला 2 कोटी रुपये कमिशन रुपात या व्यवहारापोटी देण्याचे ठरले होते. पण ठक्कर याने त्यानंतर छोटा राजन याच्याशी संपर्क साधला. छोटा राजनने ठक्कर याच्या सांगण्यावरुन बिल्डरला धमकावून 26 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप होता.
खंडणी प्रकरणी गँगस्टर छोटा राजन याच्यासह तिंघांना दोन वर्षांची शिक्षा
छोटा राजनने त्याच्या काही खास साथीदारांना परमानंद ठक्कर याच्या सांगण्यावरुन वाजेकर याच्या कार्यालयात पाठवले. वाजेकर यांना धमकी देण्यास त्यांनी सुरुवात केली. छोटा राजनच्या साथीदारांनी दोन कोटी रुपयांच्या बदल्यात वाजेकर याच्याकडे 26 कोटी रुपयांची मागणी केली. तसेच, ही रक्कम न दिल्यास वाजेकर यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. गुंडांच्या धमकीला घाबरुन वाजेकर यांनी पोलिसांशी संपर्क साधला. वाजेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात एकूण चार आरोपी असून सुरेश शिंदे, लक्ष्मण निकम उर्फ दाद्या, सुजित विजय म्हात्रे आणि छोटा राजन अशी त्यांची नावे आहेत. एजंट परमानंद ठक्कर याचा पोलीस अद्यापही शोध घेत आहेत. पोलिसांजवळ सीसीटीव्ही फुटेजही आहे. या फुटेजमध्ये आरोपी हे तक्रारदाराच्या कार्यालयात गेल्याचे दिसते. तसेच, छोटा राजनही बिल्डरला धमकावताना दिसतो आहे.