कोरोना लसीसाठी अशी असणार संपूर्ण प्रक्रिया…


न कोरोना लसीची ड्राय रन सुरू झाली आहे. दरम्यान, कोरोना लसीच्या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी, डेटा ठेवण्यासाठी आणि लोकांना या लसीसाठी नोंदणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविन अॅप तयार केले आहे. देशातील जे नागरिक आरोग्य कर्मचारी नाहीत ते कोविन अ‍ॅपवर लससाठी स्वत:ची नोंदणी करु शकतात, ज्यासाठी गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअर वरून त्यांना हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. यामुळे लसीकरण सुरू झाल्यानंतर या अ‍ॅपवर आधीच ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना लवकरात लवकर लस मिळेल.

कोविन (COVID-19 Vaccine Intelligence Network) हे eVIN (Electronic Vaccine Intelligence Network) चे अपग्रेडेड व्हर्जन असून ते विनामूल्य उपलब्ध करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ही लस सरकारला तीन टप्प्यात मिळेल. यामध्ये लसीचा डोस पहिल्या टप्प्यातील सर्व फ्रंटलाइन हेल्थकेअर प्रोफेशनल्स आणि दुसऱ्या टप्प्यात आपत्कालीन सेवांशी संबंधित लोकांना मिळेल. अशा लोकांचा डेटा देशातील राज्य सरकारांकडून गोळा करण्यात येत आहे. यानंतर ज्या लोकांना गंभीर आजारांनी ग्रासले आहे, त्यांना तिसर्‍या टप्प्यात लस दिली जाईल. यासाठी कोविन अ‍ॅपद्वारे स्वत: नोंदणी करणे (सेल्फ रजिस्ट्रेशन प्रोसेस) आवश्यक असेल.

कोविन अॅपला पाच मॉड्यूलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची सहज ट्रॅकिंग व नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी विभागले आहे. ज्यामध्ये पहिले प्रशासकीय मॉड्यूल, दुसरे रजिस्ट्रेशन मॉड्यूल, तिसरे लसीकरण मॉड्यूल, चौथे लाभार्थी स्वीकृती मॉड्यूल आणि पाचवे रिपोर्ट मॉड्यूलमध्ये विभागले आहे. ज्यांना लस घ्यायची आहे त्यांना नोंदणी मॉड्यूलअंतर्गत माहिती द्यावी लागेल. त्यांची माहिती लसीकरण मॉड्यूलमध्ये तपासली जाईल आणि लाभार्थी स्वीकृती मॉड्यूल त्यांना त्यांच्या लसीबाबत प्रमाणपत्र पाठवेल.

अशा प्रकारे करावी लागेल कोविन अॅपवर लसीसाठी नोंदणी?
आरोग्य कर्मचारी जे नागरिक नाहीत त्यांना कोविन अ‍ॅपवर नोंदणी मॉड्यूलद्वारे लसीसाठी नोंदणी करता येणार आहे. गूगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवरून कोविन अॅप डाऊनलोड करता येईल. दरम्यान, हे अॅप्लिकेशन अद्याप लाँच झाले नाही.

कोविन वेबसाइटवर स्वत: नोंदणीसाठी 12 फोटो आयडेंटिटी डॉक्यूमेंट्स (मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट आणि पेंशन माहिती) यापैकी कोणतेही एक आवश्यक असेल.

लाभार्थीला ऑनलाईन नोंदणीनंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस मिळेल, त्यानुसार लसीची तारीख, वेळ व ठिकाण दिले जाईल.