पुण्याचे ‘जिजापूर’ असे नामांतर करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी


पुणे: राजकीय पक्षांमध्ये सध्या औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यावरून शाब्दिक चकमकी झडत असतानाच आता पुण्याच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. संभाजी ब्रिगेडने पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करण्याची मागणी केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास वेळ लागत असेल तर पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव देऊन या शहराचे नामांतर ‘जिजापूर’ असे करा, अशी मागणी केली आहे. बेचिराख झालेले पुणे शहर जिजाऊंनी वसवले. जिजाऊंचा पुण्याला इतिहास आहे. माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे पुणे शहर हे प्रतीक असल्यामुळे नामांतराचे राजकारण करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करायला शिका, असे शिंदे म्हणाले.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर यावेळी त्यांनी टीकाही केली. टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास थोरात यांना कळणार आणि पचणारही नाही. आम्हाला आमचा वारसा गौरवपूर्ण चालवू द्या, असा चिमटाही त्यांनी काढला.