ईडीविरोधात मोर्चा संदर्भातील बातम्या खोट्या – संजय राऊत


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही नोटीस बजावल्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेनेची ईडीविरोधात रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु असून यासंदर्भातील बातम्याही काही माध्यमांमध्ये झळकल्या आहेत. तसेच, भाजप आमदार नितेश राणे यांनी या मोर्चावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यानंतर, ट्विटरवरुन असा कुठलाही मोर्चा वगैरे नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

ईडीच्या विरोधात शिवसैनिक मोर्चा काढणार यासंदर्भात काही माध्यमांत बातम्या आल्या आहेत. यासंदर्भात आमदार नितेश राणेंनी ट्विट केले आहे. “शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे. हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही. हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही. हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही. पण वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म?,” असे म्हणत शिवसेनेवर टीका केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी काही वेळातच ट्विटरवरुन शिवसैनिकांना आवाहन केले त्याचबरोबर मोर्चासंदर्भातील बातम्या खोट्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

ह्यासंदर्भातील बातम्या चुकीच्या असून आम्ही जेव्हा रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू. पण या कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो, असे ट्विट राऊत यांनी केले आहे.