लखनौ – देशभरातील जनतेला कोरोनाला आळा घालणाऱ्या लसीची प्रतीक्षा असताना, दुसरीकडे या लसीबद्दल समाजवादी पार्टीकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी काल भाजपच्या लसीवर आम्ही विश्वास ठेवू शकत नसल्याचे म्हटल्यानंतर आता त्यांच्यापाठोपाठ समाजवादी पार्टीचे मिर्झापूरचे विधानपरिषद सदस्य आशुतोष सिन्हा यांनी देखील लसीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.
सपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य; कोरोना लसीमुळे तुम्ही होऊ शकता नपुंसक
कोरोना प्रतिबंधक लसीमध्ये काहीतरी असे असू शकते, ज्यामुळे नुकसान होईल. लोक उद्या म्हणतील लोकसंख्या कमी करण्यासाठी/मारण्यासाठी लस दिली गेली आहे. त्याचबरोबर लसीमुळे तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता. काहीपण होऊ शकते, असे खळबळजनक वक्तव्य समाजवादी पार्टीचे मिर्झापूरचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी केले आहे. तसेच, आपणास अखिलेश यादव यांनी वॅक्सीन संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल माहिती नाही. पण त्यांनी जर काही म्हटले असेल तर यामध्ये गंभीरता नक्कीच असेल, असे देखील आशुतोष सिन्हा यांनी सांगितले आहे. तर, सध्या लसीकरण मी करून घेणार नाही. मी भाजपच्या लसीवर कसा काय विश्वास ठेवू? आमचे सरकार जेव्हा तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. भाजपची लस आम्ही घेऊ शकत नसल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.