भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्नचिह्न


नवी दिल्ली : सीरमच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, डीसीजीआयने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला परवानगी देण्यासंदर्भात काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर डीसीजीआयने स्पष्टीकरण दिले आहे.

यासंदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट करत, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप झालेली नाही. कोव्हॅक्सिनला आपातकालीन वापरासाठी मंजुरी देणे धोकादायक ठरू शकते. याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. कोरोना लसीची चाचणी पूर्ण होईपर्यंत याचा वापर करणे टाळले पाहिजे. भारतात सध्या एस्ट्रॅजेनेका लस वापरली पाहिजे.

याचबरोबर, डीसीजीआयलाही भारत बायोटेकच्या लसीबाबत उद्भवणार्‍या प्रश्नांवर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. या लसीचा वापर करणारे लाभार्थी या लसीविषयी माहिती घेतल्यानंतर जोपर्यंत संमती पत्रावर स्वाक्षरी करणार नाहीत, तोपर्यंत भारत बायोटेकच्या लसीला मंजुरी दिली जाणार नाही. जोपर्यंत लसीची चाचणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत तिला पूर्णपणे मंजुरी दिली जाणार नसल्याचे डीसीजीआयच्यावतीने सांगण्यात आले आहेत.