अजब गजब गोष्टी


मनुष्याचे मन ही मोठी अजब गोष्ट आहे. आपल्या मनाकडे काही तरी निर्माण करण्याची, निरनिराळ्या कल्पना रंगविण्याची ताकद आहे. त्याचबरोबर राग, आनंद, चिंता, कुतूहल अश्या भावनांनी आपले मन व्यापलेले असते. एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारे कुतूहल आपले मन अश्या काही गोष्टींकडे आकर्षित होते, की त्या गोष्टी पाहिल्यानंतर आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाही. अशाच काही अजब गजब गोष्टी.

कुठल्याही वर्षामध्ये ४/४, ६/६, ८/८, १२/१२ अश्या तारखा आणि फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस हे आठवड्यामधील एकाच वारी येतात. या वारला किंवा दिवसाला इंगाजीमध्ये ‘ doomsday ‘ असे म्हटले जाते. २०१७ सालचा doomsday मंगळवारी आला आहे, म्हणजेच, ४/४, ६/६, ८/८, १२/१२ या सर्व तारखा आणि फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस हे सर्वच मंगळवार आहेत.

झाडांवर उगविणारी ‘ येलो ब्रेन ‘ नावाची, पिवळ्या रंगाची बुरशी खरोखरच मानवी मेंदुसारखी दिसते. या बुरशीला ‘ yellow trembler ‘ किंवा गोल्डन जेली फंगस असे ही म्हटले जाते. ही बुरशी पर्णपाती झाडांवर उगवते. साधारण साडेसात सेंटीमिटर, म्हणजेच तीन इंचांपर्यंत वाढणारी ही बुरशी खाता ही येऊ शकते.

ब्रिटन मध्ये २००८ साली केल्या गेलेल्या एका सर्व्हे मध्ये, ५८ टक्के मुलांनी शेरलॉक होम्स ही व्यक्ती खरोखरच अस्तित्वात असल्याचे सांगितले, तर विन्स्टन चर्चिल हे व्यक्तिमत्व काल्पनिक असल्याचे काही मुलांचे म्हणणे पडले. या सर्व्हे मध्ये १२ ते सोळा या वयोगटातील जवळजवळ तीन हजार मुलांनी सहभाग घेतला. या सर्व्हे अंतर्गत मुलांना काही प्रश्न विचारले गेले असता, जवळजवळ ७७ टक्के मुलांनी, आपल्याला इतिहासाविषयी फारशी माहिती नसल्याचे कबूल केले. या मुलांना शेरलॉक होम्स, रॉबिन हूड ही काल्पनिक, कादंबऱ्यांमध्ये असणारी पात्रे खरोखरच अस्तित्वात आहेत असे वाटत होते, तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान असणारे विन्स्टन चर्चिल, हे एक काल्पनिक पात्र असल्याचा त्यांचा समज होता.

आपल्या शरीराच्या एकूण वजनापैकी चार पौंड इतके वजन आपल्या पोटामध्ये असणाऱ्या जीवाणूंचे असते असे शास्त्रज्ञांचे मत आहे. आपल्या शरीरामध्ये जीवाणूंची संख्या शरीरातील पेशींपेक्षाही जास्त असल्याचे शास्त्रज्ञ म्हणतात. आपल्या शरीरामध्ये एकूण दहा हजार जातींचे जीवाणू असल्याचे म्हटले जाते. पण यातील सर्वच जीवाणू हानिकारक नसून, आपल्या शरीरातील एनझाइम्स च्या मदतीने हे जीवाणू इतर हानिकारक जीवाणूचा नाश करण्यास मदत करतात.

जिराफ हा प्राणी, सर्व प्राण्यांमध्ये उंच तर आहेच, शिवाय त्याची जीभ ही भलीमोठी, लांब आहे. जिराफाला आपल्या जिभेने आपले कान हे साफ करता येऊ शकतात. ५३ सेंटी मिटर इतकी जिराफाच्या जिभेची लांबी असते. झाडांच्या सगळ्यात वरच्या फांद्यांपर्यंत पोचण्यास ही लांबसडक जीभ कामी येते.

१८व्या शतकामध्ये ‘ तेरार’ नावाच्या फ्रेंच माणसाने तब्बल पांढरा माणसांना पुरेल एवढे अन्न स्वतःच खाऊन टाकले, आणि त्यांनतरही भूक शमली नाही म्हणून म्हणून त्याने मांजरी, पाली तर खाल्लेच, शिवाय एक अख्खा ईल मासाही गिळून टाकला. तेरारला अशी ‘खा-खा’ का होते याचे निदान डॉक्टरही करू शकले नाहीत. लहान असल्यापासूनच तेरारची भूक विलक्षण होती. लहान असतानाच एका अख्ख्या बकरीचे मटन तो एकट्याने, एका जेवणात खात असे. इतके खाऊन ही भूक न भागल्याने, शेजाऱ्यांच्या घरातील अन्न तो चोरून खात असे. या भूकेपायी तेरारने दगड, बाटल्यांची बूचे खाण्यासही सुरुवात केली. काही काळाने तेरार फ्रेंच सैन्यात रुजू झाला. पण तिथेही त्याच्या भुकेने हाहाकार उडवून दिला. त्याला मिळत असलेल्या रेशनने त्याचे पोट भरत नसे, त्यामुळे इतर सैनिकांचे उरले-सुरले रेशन तो खाऊन फस्त करीत असे. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की इतके खाऊनही तेरारचे वजन मुळीच वाढत नसे. तो अगदी सडपातळ बांध्याचा इसम होता.

Leave a Comment