स्तनपानाचा असाही लाभ


स्तनपानाचे महत्त्व आता अनेक महिलांच्या ध्यानात यायला लागले आहे. बाळाला जन्मल्यापासूनचे सहा महिने रोग प्रतिकारक सक्ती वाढवण्यासाठी जे जे हवे असते ते सगळे काही आईच्या दुधातून मिळत असते. त्याची वाढ व्हावी आणि त्याचे अनेक विकारांपासून रक्षण व्हावे यासाठी ते गरजेचे आहेच पण आता आता असे सिद्ध झाले आहे की, स्तनपानाने मुलाला अस्थमा होण्याची शक्यता पन्नास टक्क्यांनी कमी होत असते. स्तनपान न मिळालेली मुले ते मिळालेल्या मुलांपेक्षा अस्थम्याला बळी पडण्याची ५० टक्के जास्त शक्यता असते. तेव्हा माता होणार्‍या तरुणींनी स्तनपानाच्या याही लाभावर दृष्टी ठेवून आपल्या बाळाला आवर्जुन स्तनपान दिले पाहिजे.

जर्नल ऑफ पेडियाट्रिक्स, ऍलर्जी अँड इम्युनॉलॉजी या नियतकालिकात या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ज्या मुलांना अर्भकावस्थेत फुफ्फुसाचे इन्फेक्शन झाले होते आणि याच संसर्गाचे रूपांतर अस्थम्यात होण्याची शक्यता होती. त्या बालकांना स्तनपानाचा लाभ झाला आणि अस्थमा होण्याची संकट टळले. या मुलांत केवळ अस्थमाच नाही तर फुफ्फुसाच्या संसर्गामुळे होणारे अन्यही विकार पुढे होत नाहीत आणि लहान वयात त्यांची लक्षणेही दिसत नाहीत असेही या निमित्ताने करण्यात आलेल्या प्रयोगात दिसून आले. वय वर्षे चार ते बारा या गटातल्या ९६० मुलांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. ही मुले अस्थमा झालेली होती आणि त्यासाठीची औषधे नियमाने घेत होती.

या बालकांच्या पालकांना एक प्रश्‍नावली देण्यात आली होेती. या मुलांना वयाच्या पहिल्या सहा महिन्यात स्तनपान मिळाले होते का असे विचारण्यात आले होते. तेव्हा असे आढळून आले की जी मुले अस्थम्याने आजारी आहेत त्यांना पहिले सहा महिने स्तनपानाचा लाभ झालेला नव्हता. ज्यांना स्तनपान मिळाले होते त्यांना मात्र अस्थम्याचा त्रास होत नव्हता. अशा प्रकारचे प्रयोग आणि त्या संबंधीची माहिती वाचण्यात किंवा वाचण्यात आल्याने साधारणत: मातांमध्ये स्तनपानाविषयीची जागृती वाढणार आहे. आज पर्यंतचा अनुभव तसा आहे. स्तनपानविेषयक प्रसाराचे काम जगभरात सुरू असते आणि आता जगभरातल्या अनेक पाहण्यांतून असे दिसून आले आहे की, प्रचाराचा परिणाम महिलांवर होत असून महिलांत स्तनपान देण्याचे प्रमाण वाढत आहे. आपल्या बालकाच्या आरोग्यासाठी स्तनपान दिले पाहिजे असे त्यांना वाटायला लागले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment