कोहिनूरप्रमाणेच ब्रिटनच्या ताब्यात आहेत भारताच्या अमूल्य कलाकृती


ब्रिटन च्या ताब्यात असलेला, मूळचा भारतीय असलेला कोहिनूर हिरा भारतात कधी परतू शकेल काय, या प्रश्नाचे उत्तर अद्यापि मिळालेले नाही. तेराव्या शतकामध्ये सापडलेला हा हिरा इंग्रजांनी १८५० साली पंजाब चे महाराजा दिलीप सिंह यांच्याकडून हस्तगत केला. आता भारताने हा हिरा ब्रिटन कडून परत मागितला असला तरी तो परत मिळविण्याची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची ठरणार आहे. कोहिनूर प्रमाणेच भारतातील अजून काही अमूल्य कलाकृती ब्रिटनच्या ताब्यात आहेत. या कलाकृती आता पुन्हा कधी भारतामध्ये परततील किंवा नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

सुल्तानगंज येथील साडेसात फूट उंचीची बुद्ध मूर्ती गेली दीडशे वर्ष इंग्लंड येथील बर्मिंगहॅम वस्तूसंग्रहालयामध्ये आहे. १८६१ साली बिहारमधील सुल्तानगंज येथून इंग्रजांनी ही मूर्ती हस्तगत केली होती. आता या मूर्तीला ‘बर्मिंगहॅम बुद्ध’ या नावाने ओळखले जाते. ही मूर्ती इसवी सन ५०० ते इसवी सन ७०० या काळाच्या दरम्यान घडविली गेली. भागलपूर येथे रेल्वे विस्तृतीकरण सुरु असताना केल्या गेलेल्या खोदकामामध्ये ही मूर्ती सापडली होती. अर्धा क्विंटल पेक्षा जास्त वजन असलेली ही मूर्ती शुद्ध तांब्याने बनलेली आहे. बर्मिंगहॅम येथील उद्योगपती सॅम्युअल थॉरटन यांनी ही मूर्ती त्याकाळी २०० पौंडांना विकत घेतली होती.

१८३० च्या दशकामध्ये महाराजा रणजीत सिंह यांचे सिख साम्राज्य वैभवाच्या शिखरावर होते. याच वेळी शाही सुवर्णकार असलेल्या हाफिज मुलतानी यांनी महाराजांसाठी सुवर्णाचे रत्नजडीत, कमळाच्या आकाराचे सिंहासन तयार केले. हे अष्टकोनी सिंहासन चहू बाजूंनी सोन्याने मढविलेले होते. १८४९ साली जेव्हा पंजाब इंग्रजांच्या अधिपत्याखाली आले, तेव्हा हे सिंहासन सरकारी संपत्ती म्हणून घोषित करून इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतले. १८५१ साली लंडन मध्ये भरलेल्या भव्य प्रदर्शनामध्ये हे सिंहासन ठेवण्यात आले, आणि त्यानंतर व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात हे सिंहासन ठेवण्यात आले.

आंध्र प्रदेशाची नवी राजधानी असलेली अमरावती, प्राचीन कालपासूनच बौद्ध धर्माचे महत्वाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे असलेल्या बौद्ध स्तूपाच्या चहू बाजूंनी लाइमस्टोनने बनविली गेलेली शिल्पे आणि एक दरवाजा होता. या दगडांवर पुराणातील अनेक कथा कोरण्यात आल्या होत्या. हे स्तूप इसवीसनापूर्वी तीन शतके आधीच्या काळात बनविले गेले होते. या स्तूपाचे अवशेष १७व्या शतकातील अखेरच्या दशकामध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याला सापडले होते. १८५० साली इथे उत्खनन केल्यानंतर कोरीव काम केलेली अनेक शिल्पे सापडली. ही शिल्पे आता ब्रिटीश वस्तूसंग्रहालयामध्ये ठेवलेली आहेत.

१८९० च्या दशकामध्ये ब्रिटन येथे चार फूट उंचीची संगमरवरी मूर्ती पाठविण्यात आली. इंग्रजांना ही मूर्ती मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात सापडली. या मूर्तीच्या पायाशी संस्कृतमध्ये एक शिलालेख आहे, त्यावरून ही मूर्ती ११व्या शतकातील असल्याचे समजते. ही मूर्ती जैन धर्मातील अंबिका देवीची मूर्ती आहे. मात्र ही मूर्ती सरस्वतीची असून, धार परिसरातील भोजशाला येथे ही मूर्ती पूर्वी स्थित होती असे काहींचे म्हणणे आहे.

Leave a Comment