येथे महिला करतात केस कापण्याचे काम


मोठ्या शहरातल्या ब्यूटी पार्लर्समध्ये महिला केस कापण्याचे काम करतात यात काही नवल वाटत नाही पण तिरुमल तिरुपती देवस्थानम अर्थात बालाजी देवस्थानात एक धार्मिक उपचाराचा भाग म्हणून अनेक भाविक मुंडण करून घेतात तेव्हा त्यातल्या महिला भाविकांचे मुंडण करण्यासाठी महिला कारागिर नेमण्यात आल्या आहेत. या देवस्थानात दररोज साधारण ४० ते ५० हजार भाविक दररोज मुंडण करून घेतात. या देवस्थानच्या कल्याण कट्टा भागात हे काम चालते. बालाजी हे देेेशातले सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. या देवस्थानने भाविकांच्या मुंडणाची मोफत सोय केलेली असून त्यासाठी कंत्राटी पद्धतीने काम करणारे ९४३ नाभिक नेमले आहेत. त्यांना एका डोक्याच्या मुंडणामागे देवस्थानतर्फे १० रुपये दिले जातात.

या देवस्थानाच्या दर्शनाला येऊन मुंडण करून घेणार्‍यांत महिलाही असतात पण महिलांना पुरुष कारागिरांकडून मुंडण करून घेण्यात संकोच वाटतो. म्हणून देवस्थानने या ९४३ नाभिकांत ६० महिलाही नेमल्या आहेत. त्यांनाही पुरुषांप्रमाणेच दरडोई १० रुपये मिळतात. अलीकडे या कारागिरांच्या बाबतीत एक प्रवाद निर्माण झाला आहे. या कारागिरांचे देवस्थानकडून मिळणार्‍या १० रुपयांत समाधान नाही म्हणून ते भाविकांकडूनही काही पैसे मागतात आणि ही गोष्ट तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाली आहे. शिवाय काही भाविकांनीही हे कारागिर जादा पैसे मागतात अशा तक्रारी केल्या आहेत.

या तक्रारी आणि फुटेज यांचा विचार करून देवस्थानने भाविकांकडून पैसे मागणार्‍या २४६ कारागिरांना सेवेतून निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या कारागिरांनी आपल्यावरील आरोपाचा इन्कार केला असून आपण कोणाही भाविकांकडे पैसे मागत नाही असा खुलासा केला आहे. या ठिकाणी मुंडणाची सेवा मोफत पुरविली जाते पण काही भाविकांना ही सेवा मोफत घेणे कमीपणाचे वाटते. म्हणून ते आपल्या खुशीने या नाभिकांना टीप म्हणून पैसे देतात. ही लाच नसून ती समाधानाने दिलेली दक्षिणा आहे असे या लोकांचे म्हणणे आहे. मात्र देवस्थानच्या व्यवस्थापनाने हा खुलासा फेटाळला असून हे लोक भाविकांकडून पैसे मागून घेत होते व ही गोष्ट सीसीटीव्ही कॅमेर्‍यात नांेंदली गेली असल्याचे म्हटले आहे. या देवस्थानच्या कल्याण कट्ट्यावर होणार्‍या मुंडणातून मिळणारे केस दरसाल विकले जातात आणि त्यातून देवस्थानला १०० ते २०० कोटी रुपये मिळतात.

Leave a Comment