हृदयविकारावर इलाज विवाह


आपण विवाहित असाल तर हृदयविकारापासून दूर राहण्याची आणि हृदयविकारापासून बचावण्याची शक्यता जास्त आहे असे ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीत आढळून आले आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण ही आपल्याला हृदयविकाराकडे नेणारी तीन कारणे असतात आणि विवाहित असण्याने या तीन कारणांपासून आपण दूर राहू शकतो. हृदयविकार जडला असल्यास विवाहित रुग्ण त्यातून लवकर सावरू शकतात. एकटे राहणारे मात्र त्यातून तुलनेने उशिरा सावरतात असे या पाहणीत आढळून आले आहे. जीवनात कोणाची तरी सोबत असणे हे अनेक परींनी आरोग्यास उपकारक ठरत असते कारण सोबतीने मानसिक दिलासा मिळतो.

मानसिकदृष्ट्या आपण स्वस्थ असलो की त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होत असतो. विशेषत: रक्तदाबा सारखे मनाचा कोंडमारा होऊन बळावणारे विकार अशा दिलाशाने आटोक्यात राहतात. आपल्या आसपास नजर टाकली तरीही आपल्याला या म्हणण्याचे प्रत्यंतर येईल. जोडप्याला वृद्धत्त्व आले की त्यातले कोण आधी जाणार याची चर्चा सुरू होते. दोघातली पत्नी काही कारणांनी आधी गेली पती एकटा पडतो आणि मनातली भावना व्यक्त करण्यास कोणीच उरत नाही. परिणामी मानसिक कुचंबणा होते. काही खाल्लात का असे आस्थेने विचारणारे कोणी उरत नाही. म्हणून आधी पत्नी मरण पावलेले पुरूष तिच्या मृत्युनंतर फार दिवस जगत नाहीत.

महिलांचे तसे नसते. दोघांपैकी पती आधी मरण पावला असेल तर पत्नी एकटी मागे उरते पण महिला या एकाकी पडत नाहीत. त्या स्वत:ला घरकामात गुंतवून घेतात. त्या निवृत्त होत नसतात त्यामुळे त्यांचा कोंडमारा होत नाही. आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला पती हयात राहिलेला नसला तरीही त्या आपल्या भावना जमेल त्याच्यासमोर मोकळ्या करतात. आपली मुले, सुुना, बहिणी, भाऊ असे कोणीही त्यांना चालते. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, पती मरण पावला तरीही काही बदलत नाहीत आणि त्यांचे व्यवस्थापन काही बिघडत नाही. त्यामुळे पतीच्या माघारी महिला अधिक काळ जगू शकतात. पती मात्र पत्नीच्या निधनानंतर फार काळ जगत नाही. महिला या पुरूषांपेक्षा मानसिकदृष्ट्या मजबूत असतात. त्यांना मुळातच हृदयविकार फार जडत नाही. हा विकार पुरूषांत तुलनेने अधिक प्रमाणात असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment