खासगी आणि व्यावसायिक आयुष्यामधील संतुलन महत्वाचे


आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत. आपल्या सर्वांच्याच आयुष्याची गती वेगवान आहे. त्यामुळे आपल्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यामधे समतोल साधणे तितकेसे सोपे राहिले नाही. आपल्याला नक्की कशातून समाधान मिळते याचे निकष, प्रत्येक व्यक्तीचे, वेगवेगळे असतात. आपण लहान असताना आपल्या घरामध्ये वातावरण कसे होते, या वरही काही प्रमाणात हे निकष अवलंबून असतात. आपल्या पालकांच्या किती तरी सवयी किंवा त्यांची विचारसरणी आपण कळत नकळत आत्मसात करीत असतो. त्यामुळे मोठे झाल्यानंतरही त्याच सवयी, आणि विचारसरणी आपले आयुष्य घडवीत असतात. आपण व्यवसाय किंवा नोकरी सुरू करताना, तेथील वातावरण, कामाची पद्धत, तेथील सहकारी, हे सगळे जरी आपल्याला नवीन असले तरी आपला स्वभाव, आपली विचारसरणी ही मात्र अगदी लहानपणापासूनच आपल्या बरोबर असते. त्यामुळे ऑफिस आणि घर यामधील समतोल कसा राखायचा हे ज्याचे त्याला ठरवावे लागते.

पूर्वीच्या काळी परिवारांमध्ये, स्त्री आणि पुरुष यांच्या वेगवेगळ्या भूमिका ठरलेल्या असत. ह्या भूमिका परंपरेने, एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे चालत येत. म्हणजे, पुरुषांनी घराबाहेर पडून नोकरी किंवा व्यवसाय सांभाळायचा, कुटुंबाकरिता पैसे मिळवायचे, तर स्त्रियांनी घरामध्ये राहून घरकाम करायचे, मुलांची आणि परिवारातील इतर सदस्यांची देखभाल करायची हे ठरलेले होते. कालांतराने या भूमिके मध्ये फरक पडत गेला. स्त्रिया सुशिक्षित झाल्या, नोकरी किंवा व्यवसायासाठी घराबाहेर पडताना दिसू लागल्या. तरी ही स्त्री म्हटले की सर्वप्रथम घर, मुले, घराच्या इतर जबाबदऱ्या, ही स्त्रियांच्या मनावर बिम्बविली गेलेली विचारसरणी आज ही कुठे तरी डोके वर काढताना दिसते. नोकरी आणि घर या दोहोंमध्ये ओढाताण झाल्याने सुशिक्षित, वरच्या हुद्द्यांवर काम करीत असलेल्या स्त्रिया देखील, मुलांकडे किंवा घराकडे दुर्लक्ष होते म्हणून घरात बसण्याचा पर्याय नाईलाजाने निवडताना दिसतात.

अशी होणारी ओढाताण जर टाळायची असेल तर प्रत्यकाने काही गोष्टींचा विचार आवर्जून करायला हवा. लहानपणापासून आत्मसात केलेल्या सवयी, आणि सध्याच्या वेगवान जगामध्ये टिकून राहायचे असेल तर तशी तयारी, आणि त्याकरिता आपल्या सवयींमध्ये आणि पर्यायाने, विचारसारणीमध्ये करावे लागणारे बदल, या सगळ्याचा विचार करून जर प्रत्यकाने आपल्यापुरता सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न केला, तर घर आणि व्यवसाय यामधील समतोल राखणे शक्य होऊ शकेल.

Leave a Comment