पाण्याची किंमत नक्की किती?


पाणी म्हणजे जीवन. पाण्याचे आपल्या आयुष्यातलेच नव्हे तर झाडे, पशुपक्षी यांच्या आयुष्यातले मोलही आपण चांगलेच जाणतो. कडकडून तहान लागलेली असावी आणि पाणी जवळ नसावे याच्या वेदनाही आपण कधी ना कधी सोसलेल्या असतात. तहानलेल्याच्या मुखी पाण्याचे चार थेंब जरी पडले तरी त्यापासून मिळणारे समाधान कदाचित एखादे पक्वान्नही देऊ शकणार नाही. अशा जीवनावश्यक पाण्याची किंमत ठरविणार तरी कशी? उदाहरण द्यायचे तर आपला टीम इंडियाचा कप्तान ६०० रूपये लिटर किमतीचे पाणी पितो याचे आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. पण यापेक्षाही अधिक मूल्याच्या पाणी बाटल्या आज बाजारात विकल्या जातात. किती आहेत त्यांच्या किंमती त्याची ही माहिती


अॅक्वा डी क्रिस्टलो ट्रीब्युटो ए मोडीग्लीएनी अशा भरभक्कम नावाने विकले जाणारे हे बाटलीबंद पाणी कुणीही ऐरा गैरा खरेदी करू शकणार नाही. जर बर्‍या परिस्थितीतील म्हणजे सर्वसामान्यांच्या लेखी सधन म्हणता येतील असे लोकही ही पाणी बाटली घेण्यापेक्षा एखादी चांगली कार घेण्यास पसंती देतील. कारण या बाटलीची किंमत आहे ३८ लाख ७० हजार रूपये. या बाटलीतील पाणी सुवर्णभस्म मिश्रित असते. यात ५ ग्रॅम सोन्याचे भस्म मिसळलेले आहेच पण बाटलीही सोन्याची आहे. अर्थात तुम्ही लेदर प्रेमी असाल तर त्या बाटलीतूनही हे पाणी विकत घेऊ शकता. जगातील हे सर्वात महाग पाणी आहे.


कोना निगारी वॉटर- हे जपानी ब्रँडचे पाणी. असे म्हणतात की या पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते. हवाई नावाच्या समुद्रातून कित्येक फूट खोलावरून हे पाणी वर काढले जाते. अनेक प्रयोग करून ते शुद्ध केले जाते व मग बाटलीतून उपलब्ध केले जाते. या पाण्याची किंमत आहे २६ हजार रूपये.


फिलिको- हाही जपानी ब्रँड आहे.या पाण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बाटल्यांचा आकार राजा किंवा राणीच्या मुकुटासारखा आहे. म्हणजे या बाटल्या बुद्धीबळातील राजा राणी असावेत तशा दिसतात. अतिशय आकर्षक स्वरूपाच्या बाटल्यातून मिळणारे हे पाणी १४,१२८ रूपये मोजून खरेदी करता येते.


ब्लिंग एचटूओ- एचटूओ म्हणजेच पाणी. या बाटलीवर जणू हिरेजडीत नग चढविले असावेत अशी त्याची सजावट आहे. या बाटलीतून पाणी पिणे हा वेगळाच अनुभव आहे असे म्हणतात. या वेगळ्या अनुभवासाठी फक्त २५०० रूपये मोजायची तयारी ठेवली की झाले.


व्हिन- फिनलंडमधून येणारे हे पाणी जगातील सर्वात शुद्ध पाणी मानले जाते. असे म्हणतात अन्य पाण्यांच्या तुलनेत या पाण्याने तहान लवकर भागते. बाकी बाटल्यांच्या तुलनेते हे स्वस्त आहे. म्हणजे फक्त १५०० रूपयांत ही बाटली मिळते.

Leave a Comment