स्थळ लंडन- व्यवसाय वडापाव विक्री-उलाढाल साडेचार कोटींची


मुळातच अंगात हिम्मत असेल व कांही तरी करून संकटातून बाहेर पडण्याची इच्छा असेल तर यश कसे मिळते याचे उदाहरण म्हणून मुंबईच्या दोन तरूणांकडे पाहता येईल. हे दोघेही लंडनमध्ये त्यांचे वडापाव रेस्टॉरंट चालवितात व त्यांची उलाढाल आहे वर्षाला साडेचार कोटींची. त्यांच्या श्रीकृष्ण वडापाव रेस्टॉरंटच्या आता तीन शाखा असून त्यातून वडापाव बरोबरच ६० प्रकारचे अन्य खाद्यपदार्थही विकले जात आहेत.

२००९ च्या जागतिक मंदीत जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या तेव्हा अनेकांच्या नोकर्‍यांवर गदा आली. मुंबईतील दोन मुले त्यावेळी लंडनमध्ये नोकरी करत होती त्यांचीही नोकरी गेली. सुजय सोहनी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मनजेर होते त्यांच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळली. पैशांची तंगी सुरू झाली तेव्हा त्यांनी त्यांचा मित्र सुबोध जोशी याला वडापावचेही वांधे झालेत असे सांगितले. काम करायची जिद्द होतीच, कष्टाची तयारी होती, त्याला या वडापाव शब्दाने खतपाणी घातले आणि या दोघांनी चक्क वडापाव विकायचा निर्णय घेतला.


निर्णय घेणे कदाचित सोपे होते पण जागेची व्यवस्था कशी करणार? कमी बजेटमधील जागेचा शोध त्यांनी सुरू केला व अखेर आईस्क्रिम पार्लरमधील एक छोटा कोपरा महिना ३५ हजार रूपये भाड्याने घेतला. सुरवात ना नफा ना तोटा अशीच होती. वडापाव १ पौंडात म्हणजे ८० रूपयांना तर दाबेली दीड पौंडाला असे दर होते. प्रसिद्धीसाठी या दोघांनी रस्त्यात थांबून जाणायेणार्‍यांना त्यांच्या पदार्थांची चव मोफत चाखण्याचे आमीष दाखविले व ही कल्पना चांगलीच फळली. हा इंडियन बर्गर लंडनवासियांना चांगलाच भावला. जागा कमी पडू लागल्यावर हळूहळू मोठी जागा करता करता आता त्यांच्या श्रीकृष्ण वडापाव रेस्टॉरंटच्या तीन शाखा आहेत. येथे ३५ कामगार काम करतात व पदार्थांची यादीही ६० वर गेली आहे. लग्नसमारंभासाठीही त्यांचे पदार्थ आवर्जून मागविले जातात.

Leave a Comment