कांही मनोरंजक तरीही महत्त्वाच्या गोष्टी


आपण रोजच्या जीवनात अनेक गोष्टी करतो, अनेक गोष्टी पाहतो पण त्यामागची कांही महत्त्वाची पण मनोरंजक रहस्ये आपल्याला बहुतेकदा माहिती नसतात. हे वाचून तुम्हीही कबूल कराल की या साध्यासाध्या गोष्टी तुम्हाला आजच कळल्या आहेत.

शिंकणे- प्रत्येक माणूस दिवसाकाठी कधी ना कधी शिंकतो. सर्दी झाली असेल तर वारंवार शिकतो. माणूसच काय पण मांजर, कुत्र्यांसारखे प्राणीही शिंकतात. आपण शिंकतो तेव्हा एका क्षणासाठी आपल्या हृदयाचे ठोके थांबतात हे तुम्हाला माहिती आहे काय? तसेच डोळे उघडे ठेवून आपण शिंकत नाही. म्हणजे ते आपोआप बंद होतात. अर्थात डोळे उघडे ठेवून शिंकणे हे फार महागात पडते कारण त्यामुळे डोळ्यातील बाहुल्या बाहेर येण्याचा धोका निर्माण होतो. तेव्हा हा प्रयोग शक्यतोवर न केलेलाच बरा.


आपली नखे आपण नाही न करताही वाढत असतात. त्यातही हाताची नखे पायांच्या तुलनेत अधिक वेगाने वाढतात पण ज्या हाताने आपण काम करतो त्या हाताची नखे दुसर्‍या हाताच्या तुलनेत जास्त वेगाने वाढत असतात.


दारू पिऊन टल्ली झालेले दारूडे आपण अनेकदा पाहतो. माणसेच नाही तर हत्तींनाही दारूचे व्यसन लागते. माकडेही कधी तरी मद्याची चव चाखतात. पण विंचवावर जर दारू ओतली तर तो वेडाच होतो व स्वतःलाच चावत सुटतो. समुद्री खेकड्यांचे हृदय त्यांच्या डोक्यात असते. पालीचे हृदय मिनिटाला १ हजार वेळा धडकते तर माणसाचे ७२ वेळा. फुलपाखरे स्वादाची ओळख पायांच्या सहाय्याने करतात.


माणसांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी अनेक उपाय योजना केल्या जातात. त्यात गर्भप्रतिबंधक गोळ्यांचाही समावेश असतो. तुम्हाला माहिती आहे का की या गोळ्यांचा माणसांवर जसा परिणाम होतो अगदी तसाच परिणाम गोरीला माकडांवरही होतो.


सायंकाळी तुम्ही तुमची उंची मोजली व सकाळी मोजली तर सकाळी ती १ सेंमीने जास्त भरते. माणसाच्या शरीरात जितकी हाडे असतात, त्यातील २५ टक्के हाडे पायात असतात. तुम्ही कानात १ तासभर हेडफोन घालत असाल तर तुमच्या कानात ७०० टक्के अधिक जंतू निर्माण होतात. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतेच. ते यायला नको असेल तर कांदा कापताना च्युईंगम खाल्याने डोळ्यात पाणी येत नाही. हा प्रयोग सिंगापूर मध्ये करता येत नाही कारण तेथे च्यूईंगमचे उत्पादन, विक्री व खरेदीवर बंदी आहे. तेथे हा प्रयोग केला तर जबरदस्त दंड भरावा लागेल हे लक्षात ठेवावे.


कांगारू हा प्राणी आपण चित्रात का होईना पाहिलेला असतो. पोटाच्या पिशवीत बाळाला घेऊन उड्या मारणारा कांगारू उलटा चालू शकत नाही. मासे आपण नेहमीच खातो. या माशांची स्मरणशक्ती कांही सेकंदाची असते. गाढव हा प्राणी मूर्खपणाबद्दल कितीही प्रसिद्ध असला तरी तो त्याचे चारी पाय एकाचवेळी पाहू शकतो.

Leave a Comment