कांदा- जेवणाला देतो टेस्ट शिवाय आरोग्यासाठी बेस्ट


कांदा हा आपल्या रोजच्या आहारातला एक आवश्यक घटक. कांद्याचा वापर जगभरातील पाकसंस्कृतीत विविध प्रकाराने केला जातो. कांद्याची ग्रेव्ही, कोशिंबिर जेवणाची लज्जत वाढवितेच पण कोणत्याही भाजी बरेाबर कांदा त्याचे सूत जुळवून घेतो.जेवणाला टेस्ट हवी तर त्यात कांदा महत्त्वाचा असतोच पण राजकीय दृष्ट्याही कांद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतात कांद्याच्या किमती वाढल्या तर सरकारला त्याची दखल घ्यावी लागते अन्यथा सरकार कोसळण्याचे प्रकारही घडतात हे आपण अनुभवाने जाणतो. असा हा कांदा आरोग्यासाठीही अतिशय बेस्ट आहे. कित्येक किरकोळ आजारावर उपचार म्हणून कांद्याचा वापर करता येतो.

कांद्यात प्रामुख्याने असते ते क्रोमियम. यामुळे शरीरातील साखरेचे नियंत्रण होते. तसेच हे क्रोमियम शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवते. यामुळे शरीरातील मांसपेशींना हळूहळू ग्लुकोजचा पुरवठा केला जातो. आपल्या आहारातील रोजच्या वापराच्या भाज्यात क्रोमियमचे प्रमाण अत्यल्प असते किंवा नसतेच. म्हणून कांदा भरीला घालून केलेली भाजी, कोशिंबिर आरेाग्यासाठी अधिक चांगली.


कांदा रक्ताची गुठळी होऊ देण्यास प्रतिबंध करतो त्यामुळे हार्टअॅटॅकचा धोका कमी होतो. तसेच कांदा कोलॅस्टोरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासही उपयुक्त असल्याने रोजच्या आहारात त्याचा समावेश अवश्य असावा.


किटक, मुंग्यांनी चावा घेतल्यास कांद्याचा रस त्याजागी लावला तर वेदना कमी होतात. नाकातून रक्त येत असेल म्हणजे गुळणा फुटला तर कांदा फोडून हुंगावयास दिला तर रक्तस्त्राव थांबतो. अशा वेळी नाकात कांद्याचा रस २-३ थेंब टाकला तरी उपयोग होतो. कानात वेदना असल्यास कांदा रसाचे थोडे थेंब टाकले की गुण येतो तसेच सर्दी खोकला पडसे या विकारात कांदा रस व मध एकत्र करून घेतल्याने उपयोग होतो तसेच ताप असेल तर तोही उतरतो.


उन्हाळ्याच्या दिवसांत कांदा फारच महत्त्वाचा ठरतो. कच्चा कांदा सेवन केल्याने उन्हाचा त्रास कमी होतो इतकेच नाही तर उन्हातून बाहेर जायचे असेल तर कांदा नुसता बरोबर ठेवला तरी उष्माघातापासून सुटका होते. उन्हाळ्यात मिळणारे पांढरे कांदे शरीरासाठी थंडावा देणारे असतात. उष्माघाताचा त्रास झाला तर कांद्याचा रस थोडयाप्रमाणात प्यावा तसेच तळपायांना हा रस चोळला तर उष्माघाताचा त्रास कमी होतो.

सांधेदुखीवर कांदा रस मोहरीच्या तेलात मिसळून लावल्यास सांधेदुखी कमी होते तसेच कांद्याचे नियमित सेवन पोट साफ ठेवण्यास उपयुक्त असते. कांद्यात फायबर खूप असल्याने पोट साफ होते तसेच गॅसेसचा त्रास कमी होतो. त्वचेसाठीही कांदा फार गुणकारी आहे. वेळेअगोदर त्वचेवर सुरकुत्या येत असतील तर त्या रोखण्यास कांदा मदत करतो


केसगळतीच्या त्रासावरही कांदा उपयोगी आहे. कांद्याचा रस डोक्याला चोळून केस धुतल्याने केसगळती कमी होते, डोक्यातील कोंडा कमी होतो तसेच कांदा खाल्याने दातातील तसेच तोंडातील वेदनाही कमी होतात. झोप येत नसल्यास, डोके दुखत असल्यास तीन चमचे पाणी व १ चमचा कांदा रस यांचे मिश्रण साखर घालून घ्यावे. आराम पडतो.


महिलांना मासिक पाळीचा त्रास होत असेल तर पाळी येण्यापूर्वी कच्चा कांदा नियमाने खाल्यास हा त्रास कमी होतो. मुळव्याधीच्या त्रासात रात्री दह्यातील कांद्याची कोशिंबिर खाल्ली तर हा त्रास कमी होतो.

Leave a Comment