जागतिक आरोग्य संघटनेकडून Pfizer-BioNTech लसीच्या आपातकालीन वापराला मंजुरी


नवी दिल्ली – फायझर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपातकालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी परवानगी दिली आहे. अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. ८ डिसेंबरला लसीच्या वापरासाठी ब्रिटनने सर्वात आधी परवानगी दिल्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी दिली होती.

फायझर-बायोटेकची कोरोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळालेली पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. कोरोना प्रतिबंधक लस संपूर्ण जगाला उपलब्ध व्हावी, यादृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटले आहे. मॅरिएंगेला सिमाओ यांच्यावर औषधे उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आहे.

लस प्राथमिकता असणार्‍या लोकसंख्येपर्यंत पोहोचावी यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात जागतिक प्रयत्नाची गरज आहे यावर मी भर देऊ इच्छिते, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्यामुळे अनेक देशांमधील नियामक प्रशासनाला कोरोना लसीच्या आयात आणि वितरणाला परवानगी देण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने आपले तज्ज्ञ तसेच जगभरातील इतर तज्ज्ञांनाही फायझर-बायोटेकच्या सुरक्षा, दर्जा तसेच इतर गोष्टींची पडताळणी करण्यास सांगितले होते. यादरम्यान फायझर-बायोटेकची लस सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या निकषावर योग्य असल्याचे समोर आले. तसेच कोरोनामुळे निर्माण होणारे धोके लसीमुळे दूर होत असल्याचेही सांगण्यात आले.