कोलकाता – काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसला सोडचिट्ठी देत पश्चिम बंगालचे माजी परिवहन मंत्री सुवेंदु अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तृणमूलमधील विविध नेते गेले काही दिवस भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच आता तृणमूलचे बडे नेते आणि सुवेंदु यांचे बंधू सौमेंदु अधिकारी हे आज संध्याकाळी तृणमूलच्या ५,००० कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुवेंदु अधिकारी यांनी दिली.
तृणमुलचा बडा नेता ५,००० कार्यकर्त्यांसह होणार भाजपमध्ये दाखल
सुवेंदु यांनी पूर्व मिदनापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना घोषणा केली. आज भाजपमध्ये माझा भाऊ सौमेंदुदेखील प्रवेश करणार आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये त्याने केलेल्या कामाची योग्य ती दखल न घेतल्याने तो असमाधानी आहे. म्हणूनच आपल्या ५,००० समर्थकांसह आणि काही इतर नेत्यांसह तो भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. तो सायंकाळी कोंटाई येथे भाजप प्रवेश करणार असल्यामुळे आता तृणमूलचा नाश अटळ असल्याचे सुवेंदु म्हणाले असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.
पक्षप्रवेशाच्या वेळी सुवेंदु अधिकारी यांनी ममता यांच्यावर तोफ डागली होती. ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत. तृणमूल काँग्रेसमध्ये मला प्रचंड मानसिक छळाला सामोरे जावं लागले. ज्या नेत्यांनी त्यावेळी मला त्रास दिला, ते आता मला, पाठीत खंजीर खुपसणारा माणूस अशी उपमा देत आहेत. ममता बॅनर्जींवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. त्या कुणाचाच विचार करत नाहीत. मी एक गोष्ट खात्रीने सांगतो की २०२१ मध्ये होणारी निवडणूक तृणमूल काँग्रेसला जिंकता येणार नसल्याचे सुवेंदु अधिकारी म्हणाले होते.