शालेय पाठ्यपुस्तकात व्हावा कोरेगाव-भीमाच्या इतिहासाचा समावेश ; रामदास आठवले


पुणे – शालेय पाठ्यपुस्तकात कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहासाचा समावेश व्हायला हवा. पाठ्यपुस्तकांमध्ये या इतिहासाचा समावेश झाला, तर तो सर्व मुलांनाही कळेल, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. आपण यासाठी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करू, असेही आठवले यांनी म्हटले आहे. शुक्रवारी कोरेगाव भीमा येथे जाऊन आठवले यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आठवले यावेळी दलित-सवर्ण मुद्द्यावर बोलताना म्हणाले, दलित-सवर्णांना जोडण्यासाठी आणि दलितांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी देशात समता यायला हवी. तसेच देशातील दलित आणि सवर्णांमध्ये असलेले गैरसमज दूर व्हायला हवेत. गावागावांत एकी निर्माण व्हायला हवी आणि एकी गावात निर्माण झाली तर देशाचा विकास झपाट्याने होईल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2021 मध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित आदिवासी, ओबीसी आणि सवर्ण या सर्वांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करेल, असेही आठवले यावेळी म्हणाले. आठवले यांना नव्या वर्षाच्या संकल्पासंदर्भात विचारले असता, आपण नव्या वर्षात रिपब्लिकन पक्ष देशभरात मजबूत करण्याचा संकल्प केला असून मी रिपब्लिकन’अशी आमची घोषणा असेल, असे ते म्हणाले.