हॉलिवूडची Wonder Woman झाली बिल्किस बानोंची ‘ जबरा फॅन’


नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधी आंदोलनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आणि ‘शाहीनबाग दादी’ म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या बिल्किस बानो पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बिल्किस बानो यांना खऱ्याखुऱ्या जीवनातील आश्चर्यकारक महिला अर्थात ‘वंडर वुमन’ असे अलिकडेच प्रदर्शित झालेला हॉलिवूडचा सिनेमा ‘वंडर वुमन 1984’ मध्ये प्रमुख भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री गल गडॉट हिने म्हटले आहे.


सोशल मीडियावर गल गडॉट कायम सक्रिय असते. काल तिने नववर्षाच्या निमित्ताने २०२० वर्षातील स्वतःसाठी ‘रिअल लाइफ वंडर वुमन’ असलेल्या काही महिलांचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले. तिने यामध्ये ‘शाहीनबाग दादी’ अर्थात बिल्किस बानो यांचाही फोटो शेअर केला आहे.

२०२०मधील आश्चर्यकारक महिलांचे पोस्ट करताना गडॉटने, काही माझ्या खूप जवळच्या आहेत…काही प्रेरणादायी महिला आहेत…तर काही असाधारण महिलाही आहेत ज्यांची भविष्यात भेट होईल, अशी आशा आहे. आपण एकत्र आलो तर अनेक आश्चर्यकारक बाबी करू शकतो, अशा आशयाचा मेसेज लिहिला आहे. बिल्किस बानो यांच्याशिवाय अमेरिकेच्या नव्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न, गल गडॉटच्या कुटुंबातील महिला आणि काही मैत्रिणींचे फोटोही गडॉटने शेअर केलेल्या वंडर वुमन लिस्टमध्ये आहेत. गल गडॉटने शेअर केलेली पोस्ट नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस पडली असून युजर्स तिच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.