समाजवादी पक्षाच्या माजी मंत्र्याकडे सापडली ३७९० कोटींची बेकायदेशीर संपत्ती


नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आर्थिक घोटाळ्यांप्रकरणात आरोपी असणारे समाजवादी पक्षाच्या सरकारमधील माजी मंत्री राहिलेल्या गायत्री प्रसाद प्रजापती यांच्या घरासोबतच कार्यालयामध्ये छापे मारले असून ईडीच्या हाती या कारवाईमध्ये अनेक कागदपत्र, हवाला माध्यमातून फिरवण्यात आलेल्या पैशांसदर्भातील माहिती लागली आहे. ईडीने बुधवारी आणि शुक्रवारी केलेल्या या कारवाईमध्ये गायत्री प्रजापतींबरोबरच त्यांची मुले आणि जवळच्या नातेवाईकांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर छापे मारले. बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणामधील काही धक्कादायक कागदपत्र या छाप्यांमध्ये ईडीच्या हाती लागली आहे.

माजी खाण मंत्री असणाऱ्या प्रजापती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असणाऱ्या ४४ हून अधिक ठिकाणच्या संपत्ती आणि जमिनींसंदर्भातील माहिती समोर आली आहे. तीन हजार ७९० कोटी रुपये या सर्व संपत्तीची किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे. तपास अधिकाऱ्यांनी ही संपत्ती बेकायदेशीररित्या कमावल्याचे सांगितले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्तीचे कागदपत्र सापडल्याने या प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढवण्यात आला असून अनेक ठिकाणी छापेमारी सुरु करण्यात आली आहे.

न्यूज १८ ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार ईडीला ११ लाख रुपयांच्या जुन्या चलनी नोटा, पाच लाख किंमतीचे स्टॅम्प पेपर आणि इतरही बरीच संपत्तीची माहिती मिळाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आपल्या नोकराच्या नावाने प्रजापती यांनी संपत्ती जमा केल्याचे उघड झाले आहे. २०० कोटींची संपत्ती प्रजापती यांच्या ड्रायव्हरच्या नावावर असल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागण्याचे वृत्त आहे.

ईडीच्या काही तुकड्यांनी ३० डिसेंबर रोजी लखनऊमध्ये प्रजापती यांच्या मुलाच्या कार्यालयाबरोबरच, कानपूरमधील प्रजापती कुटुंबियांचे चार्टड अकाउटंट, अमेठीमध्ये राहणारा प्रजापती यांच्या चालकाच्या घरी एकाचवेळी छापा मारला. ईडीला या छापेमारीमध्ये खूप महत्वाचे कागदपत्र हाती लागले आहेत. बेकायदेशीर पद्धतीने कमावलेल्या संपत्तीची या सर्व कागदपत्रांमध्ये माहिती आहे. काही वर्षांपूर्वीच चलनामधून हद्दपार झालेल्या ११ लाख रुपये मुल्य असणाऱ्या जुन्या चलनी नोटा, पाच लाख रुपये किंमतीचे स्टॅम्प पेपर, पुण्यामध्ये कोट्यावधींची संपत्ती, चालकाच्या नावे २०० कोटींच्या संपत्तीचे पुरावे लखनऊमध्ये ईडीच्या तुकडीला सापडले आहेत.

असे अनेक पुरावे छापेमारी करणाऱ्या तुकड्यांना सापडले आहेत, ज्यामधून प्रजापती कुटुंबाने बेकायदेशीररित्या संपत्ती जमा केल्याचे सिद्ध होत आहे. प्रजापती कुटुंबाने काळा पैसा हा अधिकृत कमाई असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचेही या कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे. प्रजापती कुटुंबाने लखनऊमध्ये ११० एकर जमीन खरेदी केल्याचेही या कागदपत्रांमधून उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे आता ईडीने पुण्यामधील नोंदणी विभागाकडून येथील संपत्तीसंदर्भातील माहिती मागवली आहे. गायत्री यांच्याविरोधात हवाला कायद्याअंतर्गत २०१९ साली ऑगस्टमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गायत्री प्रजापती हे सध्या सामुहिक बलात्कार प्रकरणासाठी तुरुंगात आहेत तर त्यांचा मुलगा आर्थिक घोटाळ्यांच्या गुन्ह्यांसाठी तुरुंगामध्ये आहे.