भोंगळ कारभार! उत्तर प्रदेशातील ग्रामपंचायत प्रमुखपदी पाकिस्तानी महिलेची निवड


लखनऊ – उत्तर प्रदेशमधील इटा येथील जालिसार ब्लॉकमधील एका पंचायतीची हंगामी ग्रामप्रधान (सरपंच) म्हणून मूळची पाकिस्तानी असणारी एक महिला काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. बानो बेगम असे या महिलेचे नाव असून त्या मूळच्या कराचीच्या आहेत. मागील ४० वर्षांपासून बानो या भारतात राहत आहेत. येथील एका स्थानिक व्यक्तीशी बानो यांचा विवाह झाला असला तरी त्यांच्याकडे पाकिस्तानचा पासपोर्ट आहे.

ग्रामप्रधान पदावरुन बानो बेगम यांना हटवण्यात आले असून आता या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये बानो यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे आदेशही देण्यात आल्याची माहिती इटाचे जिल्हा पंचायतराज अधिकारी अलोक प्रियदर्शनी यांनी दिल्याचे हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. बानो यांना आधारकार्ड आणि इतर सरकारी कागदपत्रे कशी काय मिळाली यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेशही इटाचे जिल्हा दंडाधिकारी सुखलाल भारती यांनी दिले आहेत. बानो यांना याच कागदपत्रांच्या आधारे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडण्यात आल्यानंतर त्या गावातील पंचायतीच्या प्रमुख झाल्या.

बानो बेगम या ६५ वर्षांच्या असून इटामधील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी त्या ३५ ते ४० वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात आल्या होत्या. त्यांनी त्याचवेळी येथील अख्तर अली या स्थानिकाशी लग्न केल्यानंतर त्या इटामध्येच राहतात. त्यांच्याकडे व्हिजा असून त्यांनी अनेकदा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. बानो यांच्याविरोधात गावातीलच एका व्यक्तीने तक्रार दाखल करत त्या पाकिस्तानी असल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरु झाली.

हा दावा खरा असल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आणि आता प्रशासनाची हे घडले कसे हे शोधून काढण्यासाठी एकच धावपळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. बानो यांची २०१५ च्या पंचायत निवडणुकांमध्ये गौडौ गावातील पंचायत सदस्य म्हणून निवड झाली. ग्रामप्रधान असणाऱ्या सेहनात बेगम यांचा ९ जानेवारी २०२० रोजी मृत्यू झाला. त्यानंतर गावतील नागरिकांच्या समितीने बानो बेगम यांच्याकडे हंगामी स्वरुपात ग्रामपंचायतीचे प्रमुख पद दिल्याचे जिल्हा पंचायतराज अधिकारी अलोक प्रियदर्शनी यांनी सांगितले आहे. बानो यांना या प्रकरणामध्ये कागदपत्रे मिळवून देण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी मदत करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.