सामनाच्या संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून रश्मी ठाकरेंना पत्र लिहीणार चंद्रकांत पाटील


मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सामनाच्या संपादकीयमधून काही दिवसांपूर्वी निशाणा साधण्यात आला होता. दरम्यान, आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून पत्र लिहिणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त मी गेलो होतो. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असे मी त्यावेळी म्हटले होते. सामनाने त्यावेळी माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. मी रश्मी ठाकरे यांना या विषयी एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात. याचा अर्थ अग्रलेख हा तुमच्या नावाने लागतो, असे पाटील म्हणाले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर ज्या प्रकारची भाषा त्यांनी वापरली, ती भाषा रश्मी ठाकरे या संपादिका असलेले संपादकीय असूच शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुंबई महानगरपालिका ही काही जणांची जहागीर झाली असून त्या त्या वेळी अनेक राज्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिका त्यांना राहू दे, असे म्हटले. त्याच्यातून पैसे निर्माण करत, राजकारण करत आता अशी वेळ आली आहे की मुंबईकरांच्या नागरी समस्या आता बाजूला राहिल्या आहेत. राजकारणात मजबूत होण्याचाही प्रयत्न करू लागले. ते आता ही मजबूतीही या अनैसर्गिक सरकारमध्ये घालवून बसणार आहेत. २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेसहित अनेक निवडणुका आहेत, त्या जिंकणे आमचे लक्ष्य असल्याचेही पाटील म्हणाले.