कोरोना लसीसंदर्भात आज मोठा निर्णय होण्याची शक्यता


नवी दिल्ली : कोरोना लसीसंदर्भात नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची 1 जानेवारी म्हणजेच आज कोरोना लसीसंदर्भात बैठक होणार आहे. तीन कंपन्यांच्या डेटाचे पुनरावलोकन होणार असून, ज्यांनी आपातकालीन वापराची परवानगी मागितली आहे. या समितीच्या शिफारशीवर या बैठकीत डीसीजीआय निर्णय घेणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि फायजर या कंपन्यांनी आपातकालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे.

कोरोना लसीसंदर्भात सर्वात आधी 9 डिसेंबर रोजी सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीत आमच्या डेटाबद्दल अजून माहिती देण्यासाठी आम्हाला आणखी काही वेळ हवा आहे, अशी लेखी विनंती फायजरने केली होती. यानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने फायजरला मुदतवाढ दिली होती.

सीरम इन्स्टिट्यूटने जमा केलेला सुरक्षा डेटा 14 नोव्हेंबरपर्यंतचा होता. दीर्घ चर्चेनंतर समितीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे पुनरावलोकनासाठी काही माहिती मागितली. ज्यात क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील अपडेटेड डेटा, त्याचबरोबर ब्रिटन आणि भारतात केलेल्या क्लिनिकल ट्रायलच्या इम्युनोजेनिसिटी डेटा तसेच यूकेच्या नियामकाकडे इमर्जन्सी यूज ऑथोरायजेशनच्या परवानगीची माहितीचा समावेश होता.

दूसरीकडे भारत बायोटेककडेही सर्व माहिती मागितली आहे. सध्या सुरु असलेल्या क्लिनिकल ट्रायलची कार्यक्षमता आणि सुरक्षेची माहिती समितीसमोर सादर करावी, असे भारत बायोटेकला सांगण्यात आले आहे. यानंतर 17 डिसेंबरला पुन्हा एकदा सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली. ज्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडकडून आणखी माहिती मागण्यात आली, जी जमा करण्यात आली.

नंतर 30 डिसेंबर रोजी पुन्हा एका कोरोना लसीबाबत एसईसी म्हणजेच सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, फायजर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक लसीच्या आपत्कालीन वापराबाबत चर्चा झाली. या बैठकीत एसईसीने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून मिळालेल्या अतिरिक्त माहितीवर चर्चा झाली. या बैठकीतही फायजरने आणखी काही वेळ मागितला. कंपन्यांनी जो अतिरिक्त डेटा सोपवला आहे त्याचे पुनरावलोकन केले जात आहे. यावर 1 जानेवारी म्हणजे आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे.

आज पुन्हा एकदा बैठक घेऊन डेटा रिव्यू केल्यानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी शिफारस करु शकते. ही शिफारस डीसीजीआय म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया केली जाईल. त्या आधारावर डीसीजीआय आपला निर्णय जाहीर करेल.

दरम्यान ज्या ऑक्सफर्ड आणि एस्ट्रेजनेकाची लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करत आहे आणि भारतात चाचणी करत आहे, त्याला ब्रिटनमध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीच्या पहिल्या बैठकीत म्हटले होते की, जर यूकेच्या नियामकाकडून परवानगी मिळाली, तर याची माहिती डेटासोबत द्यायची आहे. तर भारतात या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीही झाली असल्यामुळे सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी या लसीबाबत सकारात्मक प्रतिसाद देईल अशी अपेक्षा आहे, जेणेकरुन डीसीजीआयकडून परवानगी मिळेल.

कोणत्या कोरोना लसीला आता पहिल्यांदा मंजुरी मिळणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण यासाठी भारत सरकारने तयारी पूर्ण केली आहे. कोल्ड स्टोअरेजपासून वॅक्सिनेटरचे प्रशिक्षण आणि ज्यांना प्रशिक्षण द्यायचे आहे, त्यांची माहिती जमा केले आहे. पहिल्या टप्प्यात ही लस तीस कोटी नागरिकांना दिली जाईल, ज्यासाठी प्राथमिकता निश्चित केली आहे.

सर्वात आधी आरोग्य कर्माचारी, मग फ्रण्टलाईन कर्मचारी आणि त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या तसेच 50 वर्षांखालील वयाचे लोक ज्यांना गंभीर आजार आहेत, त्यांना ही लस दिली जाईल. यासंदर्भात चार राज्यांमध्ये दोन दिवसांचे ड्राय रनही करण्यात आले आहे. तर उद्यापासून म्हणजेच 2 जानेवारीला सर्व राज्यांमध्ये एक दिवसाचे ड्राय रन केले जाईल.