मुकेश अंबानींना मागे टाकत झोंग शानशान बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती


बीजिंग: मिनरल वॉटर आणि कोरोनाची लस बनविणारे चीनचे उद्योजक टायकून झोंग शानशान यांच्या संपत्तीत यावर्षी खूप वाढ झाली असून झोंग शानशान हे आता फक्त आशियातीलच सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत तर संपत्तीच्या बाबतीत त्यांनी चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अलिबाबाचे जॅक मा यांना देखील मागे टाकले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबाबत ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सचा अहवाल सप्टेंबरमध्ये आला होता. झोंग शानशान हे ज्यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत १७ व्या क्रमांकावर होते. त्यांना तेव्हा आशियातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुकेश अंबानीनंतर दुसरे श्रीमंत व्यक्ती म्हटले गेले होते. त्यानंतर असा अंदाज व्यक्त केला जात होता की ज्या वेगाने त्यांची संपत्ती वाढत होती, रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना ते जबरदस्त टक्कर देऊ शकतात. आता हीच गोष्ट घडली आहे. कारण त्यासंबंधी एक नवा डेटा समोर आला आहे.

पत्रकारिता, मशरूम लागवड आणि आरोग्य क्षेत्रात झोंग (६६) यांचा व्यवसाय आहे. नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ७०.९ अब्ज डॉलर्सवरून वाढून ७७.८ अब्ज डॉलरवर यावर्षी झोंगची संपत्ती गेली आहे आणि त्यासह ते जगातील ११व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सच्या नवीन अहवालानुसार, संपत्तीतील जलद वाढ होण्याचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे. ते देखील अशा वेळी जेव्हा त्यांना चीनच्या बाहेर फारसे कुणी ओळखत नव्हते.

त्यांनी एकूण संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. कारण ७६.९ अब्ज डॉलर्सवर झोंग यांची एकूण संपत्ती पोहचली आहे. यापूर्वीच चीनच्या अनेक उद्योजकांना झोंगने मागे टाकले आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अंबानीपूर्वी ओळखले जाणारे चीनचे टेक दिग्गज जॅक मादेखील झोंगपेक्षा खूप मागे आहे. त्यांची एकूण संपत्ती ५१.२ अब्ज डॉलर्स असल्याची नोंद आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत यामध्ये घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये त्यांची व्यवसाय संपत्ती ६१.७ अब्ज डॉलर्स होती.