९३ महिलांची हत्या करणाऱ्या क्रुकर्म्याचा तडफडून मृत्यू


वॉशिंग्टन: अमेरिकेतील सर्वात खतरनाक सीरियल किलर सॅम्युअल लिटील याचा मृत्यू झाला असून ३० वर्षात सॅम्युअलने एकूण ९३ महिलांची हत्या केली होती. मधुमेह, हृदयरोग व इतर आजारांनी सॅम्युअल हा त्रस्त होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अनेक हत्यांच्या प्रकरणी सॅम्युअल हा दोषी आढळल्यानंतर तो २०१४ पासून तुरुंगात होता. त्याची प्रकृती बरी नसल्यामुळे त्याला कॅलिफोर्नियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याला तिथेच मृत्यूने गाठले. त्याने हत्यांप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत आरोपांचा इन्कार केला होता. त्याला पोलिसांनी अनेकदा ताब्यात घेऊन चौकशी केली होती. लिटीलने जवळपास ७०० तासांच्या चौकशीनंर आपल्या दुष्कृत्यांची कबुली दिली. यामध्ये अनेक हत्या प्रकरणांचा उलगडा झाला.

क्रुकर्मी सॅम्युअल हा एक उत्तम कलाकार असल्याचेही समोर आले. आपण हत्या केलेल्या लोकांची रेखाचित्रे बनवून त्याने त्यांची माहिती पोलिसांना दिली. त्याशिवाय या हत्या कधी केल्या, कोणत्या वर्षी केल्या आणि मृतदेहांची विल्हेवाट कशी लावली याचीही माहिती त्याने पोलिसांनी दिली. १९७० ते २०१५ च्या दरम्यान लिटीलने ९३ जणांची हत्या केल्याची कबुली दिली. सॅम्युअलने बहुतांशी हत्या या फ्लोरिडा आणि दक्षिण कॅलिफोर्नियात केल्याचे समोर आले.

या हत्यांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी ६० हत्यांची माहिती योग्य असल्याचे आढळून आले. इतरही हत्यांबाबत सॅम्युअलने केलेला दावा चुकीचा नसणार, असेही त्यांनी म्हटले होते. सॅम्युअलने हत्या केलेल्या मृतांमध्ये बहुतांशी महिलांचा समावेश होता. यामध्ये शरीर विक्रेय करणाऱ्या, अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या आणि गरीब महिलांचा समावेश होता.