शहीद जवानाच्या कुटुंबाला आणि शेतकऱ्यांना तीन महिन्याचा पगार देणार नवनीत राणा


अमरावती : कोरोना महामारीमुळे सर्वच स्तरातील नागरिकांना मोठा धक्का बसला. त्यातच अनेक राजकीय नेते आता त्यांच्या मदतीला धावून येत असल्याचे दिसत आहे. आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी आताही असाच एक मोलाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांनी तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला आणि त्यानंतरचा हा पगार शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा केली आहे.

कर्तव्यावर असताना कुल्लू मनालीत अमरावती जिल्ह्यातील पिंगळखुटा येथील जवान कैलास दहीकर यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या अकाली जाण्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण परिस्थिती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपला खासदारकीचा पगार शहीद कैलास दहीकर यांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांनी शहीद जवानाच्या कुटुंबाला तब्बल 2 लाख 51 हजार रुपयांचा पगार दिला आहे. विशेष म्हणजे सैनिक कैलास यांच्या आई वडील आणि पत्नीला हा धनादेश यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश अमरावतीत एका कार्यक्रमात देण्यात आला आहे.

नेहमीच आपल्या खास उपक्रमांमुळे नवनीत राणा या चर्चेत असतात. त्या कधी शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करतात तर कधी शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसतात असो. त्यामुळे खासदार राणा आताही यांच्या या निर्णयामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतूक करण्यात येत आहे. दरम्यान, ते यानंतरचा पुढचा पगार हा शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणाही नवनीत राणा यांनी केली आहे.