कोरोना लसीकरणाबाबत मोदींनी दिली मोठी माहिती


राजकोट – भारतात जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याच्या दृष्टीने तयारी सुरु असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. सध्या शेवटच्या टप्प्यात लसीकरणाची तयारी असून भारतात निर्मिती झालेल्या लसीचा डोस लोकांना मिळेल, असेही नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील राजकोटमध्ये एम्स रुग्णालयाच्या भूमीपूजनावेळी सांगितले आहे.

सध्या देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट होत आहे. जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम आम्ही राबवण्याची तयारी करत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. आपल्याला आरोग्य हीच संपत्ती आहे हे २०२० ने चांगल्याप्रकारे शिकवले असून अनेक आव्हाने घेऊन हे वर्ष आल्याचेही त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, जागतिक आरोग्याचे भारत मुख्य केंद्र म्हणून उदयास आले आहे. आपल्याला २०२१ मध्ये आरोग्य सेवेसाठी भारताची भूमिका बळकट करावी लागेल.

यावेळी काँग्रेसवरही नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला. आपले आरोग्य क्षेत्र २०१४ मध्ये वेगळ्याच दिशेला होते. वेगवेगळ्या दृष्टीकोनातून काम केले जात होते. प्राथमिक आरोग्य केंद्राचाही वेगळीच प्रणाली होती. गावात योग्य सुविधा मिळत नसल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले. योग्य वेळेत भारताने पाऊले उचलल्यामुळे आपण आज चांगल्या स्थितीत आहोत. १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात एक कोटी लोकांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली असल्याचे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. २०२० मध्ये कोरोनामुळे निराशा होती. चारही बाजूला अनेक प्रश्न होते. पण आता २०२१ नवी आशा घेऊन येत असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले.