दुखापतग्रस्त उमेश यादव कसोटी मालिकेबाहेर


नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या अडचणींत वाढ झाली आहे. कारण दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागलेला उमेश यादव उर्वरित कसोटी मालिकेला मुकणार आहे. उमेशच्या पायाला ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ८ वे षटक टाकत असताना दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते.

पीटीआय या वृत्तसंस्थेला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उर्वरित कसोटी मालिकेला उमेश यादव मुकण्याची शक्यता आहे. पहिल्या डावात एकही बळी न घेतलेल्या उमेश यादवने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्सला माघारी धाडले होते. आता उमेशच्या जागी भारतीय संघात टी. नटराजनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अनुभवी सलामीवीर रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघातील समावेश निश्चित झाला आहे; परंतु रोहितला खेळवण्यासाठी मयांक अगरवाल किंवा हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला वगळण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे. याचप्रमाणे रोहित नेमका कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार, ही क्रिकेटपटूंची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.