बिल गेट्स यांनी सांगितले कसे असेल नववर्ष


नवी दिल्ली – कोरोना महामारीशी लढणार्‍या जगाबद्दल प्रसिद्ध उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर कोरोनाविषयी सतर्क राहण्याचा सल्ला बिल गेट्स यांनी दिला. तसेच कोरोना विरूद्ध लढण्यासाठी 2021 अपेक्षा वाढवणारा असेल, असा त्यांना विश्वास आहे. येत्या काळात गोष्टी सामान्य होऊ शकतात. आपल्या ब्लॉगच्या नवीन पोस्टमध्ये हे वर्ष शोकांतिका असल्याचे वर्णन गेट्स यांनी केले आहे.

त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये स्पष्ट केले की 2021 हे सहज सोपे वर्ष असणार नाही. 2021 चा पहिला महिना संगणकाच्या मॉडेल्सनुसार कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे खूपच कठीण असू शकतो आणि म्हणूनच लवकर या नवीन स्ट्रेनला नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान ते २०२१ बद्दल देखील सकारात्मक आहे.

गेट्स यांनी पुढे लिहिले आहे की, पुढील वर्ष सकारात्मक होण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि इतर प्रयत्नांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका कमी होईल आणि येत्या काही महिन्यांत लसीच्या परिणामामुळे जागतिक स्तरावर बदल दिसून येतील. त्यांनी या विषयी सांगताना जगभरातील शास्त्रज्ञांचे आभार मानले आहेत. कारण कोरोनाविरूद्धच्या लढाईत फायझर, मॉर्डना आणि अ‍ॅस्ट्राजेनेकासारख्या लसींना यश मिळाले आहे.

ते पुढे म्हणाले की, 2021 बाबत मी जागतिक पातळीवर होत असलेल्या सहकार्यामुळे थोडासा सकारात्मक आहे. मला असे वाटते की जगाने केवळ साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याची गरज नाही तर आपल्या काळाची सर्वात कठीण समस्या म्हणजे हवामान बदलाच्या दिशेने आवश्यक पावले उचलणे देखील आवश्यक आहे.