दिल्लीत आढळले कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे चार रूग्ण; आरोग्यमंत्र्यांची माहिती


नवी दिल्ली – कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जगभरात दहशत निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. १६ देशात आतापर्यंत पोहोचलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा भारतात काही दिवसांपूर्वी शिरकाव झाल्यानंतर देशाच्या राजधानीत आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने प्रवेश केला आहे. याबाबतची माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली.

दिल्लीमधील कोरोनाबाधितांपैकी चार रूग्णांच्या अहवालात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे आढळल्यामुळे दिल्लीत येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. नव्याने कोणत्याही प्रवाशाला आता दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. जे लोक बाहेर गावाहून किंवा बाहेरच्या देशांतून दिल्लीत दाखल झाले आहेत, त्यांचा आम्ही मागोवा घेत असल्याची माहिती सत्येंद्र जैन यांनी दिली.