कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतातील रुग्ण आणि आरोग्य यंत्रणांवर परिणाम करु शकतो – एम्स संचालक


नवी दिल्ली : कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळल्याने जगभरात एकच खळबळ उडाली आहे. ब्रिटनमधून येणाऱ्या हवाई वाहतुकीवर अनेक देशांनी बंदी घातली आहे. आता भारतातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने शिरकाव केला आहे. आतापर्यंत दोन डझनहून अधिक रुग्ण देशभरात सापडले आहेत, ज्यांच्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. कोरोनाच्या नवा प्रकाराचा 70 टक्के जास्त संसर्गजन्य असल्याचे सांगितले जात असल्यामुळे सरकारची चिंताही वाढली आहे.

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत सांगितले की, प्री-एपिडिमोलॉजिकल डेटा (pre-epidemiological data) मधून असे समोर आले आहे की, कोरोनाने अनेक ठिकाणी आपले स्वरुप बदलले आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तो अतिशय संसर्गजन्स असून वेगाने पसरतो.

भारतात नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीलाच ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन आला असण्याची शक्यता आहे. पण मागील काही आठवड्यात भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतातील रुग्ण आणि आरोग्य यंत्रणांवर परिणाम करु शकतो. त्यामुळे आपल्याला जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे, जेणेकरुन याच्या प्रादुर्भावाला आळा बसेल, असे रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.