हजारों वर्ष टिकेल असे राम मंदिर अयोध्येत उभारणार- गोविंद देवगिरी महाराज


पुणे – हजारो वर्ष टिकेल असे राम मंदिर अयोध्येत उभे राहील असा विश्वास राम मंदिर उभारणी समितीचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मंदिर उभारणासाठी एकूण ११०० कोटींचा खर्च येईल असा अंदाज यावेळी त्यांनी व्यक्त केला.

याआधी देखील २०० फुटांपर्यंत फक्त रेती असून त्याठिकाणी हजार वर्ष टिकेल असे मंदिर उभारण्याचे प्रयत्न झाले, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पण आता तज्ञांची एक समिती मुंबई, गुवाहाटी, हैदराबाद येथील आयआयटी संस्थांच्या मदतीने नेमली असून त्यांनी दोन पर्याय दिले आहेत. त्यातील कोणता पर्याय निवडावा यासाठी दोन दिवस बैठक पार पडली. दगडांच्या आधारे हे मंदिर उभे राहील आणि हजार वर्ष टिकेल, असे गोविंद देवगिरी महाराज यांनी म्हटले आहे.

न्यासाने अद्याप कोणताही विचार आतल्या मंदिराचा खर्च किती असावा याबाबत केलेला नाही. पण कोषाध्यक्ष असल्याने मला खर्चाचा विचार करावा लागतो. माझ्या मते मुख्य मंदिराचा खर्च ३०० ते ४०० कोटी होईल. बाहेरील परिसरात होणाऱ्या विकासासोबत पकडल्यास हा खर्च ११०० कोटी होईल. हा फक्त माझा अंदाज असल्याची माहिती गोविंद देवगिरी महाराज यांनी दिली.

माझ्याकडे येऊन मंदिर उभारणीसाठी देशातील एका उद्योगपतीचा व्यक्ती येत सर्व खर्च करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे मी नाव लावायचे आहे की नाही याची चौकशीही केली नाही. नाव लावायचे असेल तर प्रश्नच मिटला आणि लावायचे नसेल तर काही भाग तुम्ही देऊ शकता, असे त्यांना मी सांगितले. सामान्यातील सामन्यांचा निधी तिथे लागला पाहिजे अशी आमची भूमिका असल्याची माहिती गोविंद देवगिरी महाराज यांनी यावेळी दिली.