आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो ‘कारटा’; निलेश राणेंची शिवसेनेवर जोरदार टीका


मुंबई – पुढील महिन्यात मकस संक्रांतीपासून अयोध्येतील राममंदिरासाठी वर्गणीचे काम सुरू होणार आहे. चार लाखांहून अधिक स्वयंसेवक मकर संक्रांतीपासून १२ कोटी कुटुंबांशी संपर्क साधतील. गावागावांत हे स्वयंसेवक जातील, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितल्यानंतर सामनाच्या संपादकीयमधून शिवसेनेने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेना कार्यालय उभारणीसाठी मदत निधी घेतला जात असल्याचा एक फोटो शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


राम मंदिर उभारण्यापेक्षा जिथे वर्गणी जमा होते, ते कार्यालय उभे राहणे जास्त गरजेचे आहे, असे काहींना वाटते. राम मंदिरसाठी मागितली तर वर्गणी चुकीची. पण स्वतःच्या शाखेसाठी मागितली तर ते चालते. आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो ‘कारटा’, असे म्हणत शिवसेनेवर राणे यांनी टीका केली. ट्विटरवर एक फोटो शेअर करत त्यांनी यावर टीका केली आहे. त्या फोटोवर वाडा शहर शाखा, शिवसेना कार्यालय उभारणीसाठी मदतनीधी असे लिहिण्यात आले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून यापूर्वी राम मदिरांसाठी घेतल्या जात असलेल्या वर्गणीवर टीका केली होती.