बिहारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता; ‘जदयू’चे १७ आमदार ‘राजद’च्या वाटेवर


पाटना -बिहारमधील विधानसभा निवडणूकीत विजय मिळवत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आलं आहे. पण पडद्यामागील राजकीय घडामोडी अद्याप सुरूच आहेत. त्यातच आता नितीश कुमार यांचे सरकार त्यांच्याच पक्षातील १७ आमदार पाडू इच्छित असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट राजदच्या नेत्याने केला आहे. भाजपवर हे १७ आमदार नाराज असून, ते राष्ट्रीय जनता दलाच्या संपर्कात असून लवकरच ते राजदमध्ये प्रवेश करतील, असे या नेत्याने म्हटले आहे.

हा दावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी मंत्री श्याम रजक यांनी केला आहे. आपल्या संपर्कात संयुक्त जनता दलाचे १७ आमदार आहेत आणि ते राजदमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा रजक यांनी केला आहे. भाजपच्या कार्यशैलीमुळे जदयूचे आमदार नाराज आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे बिहारमधील सरकार पाय उतार करण्याच्या तयारीत आहेत. भाजपमुळे नाराज असल्यानेच हे १७ आमदार राजदमध्ये येण्यास इच्छुक आहेत. पण त्यांना तुर्तास त्यांना थांबण्यात आल्याचे रजक यांनी म्हटले आहे.

राजदमध्ये जदयूचे हे १७ आमदार येण्यास तयार आहेत. आताच त्यांना पक्षात घेतले, तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द होऊन आमदारकी धोक्यात येऊ शकते. पक्षांतर कायद्याप्रमाणे २५ ते २६ आमदार एकाच वेळी जदयूतून बाहेर पडून राजदमध्ये आले, तर त्यांचे सदस्यत्व कायम राहिल, असेही रजक म्हणाले. भाजपने काही दिवसांपूर्वी एनडीएतील घटक पक्ष असलेल्या आणि बिहारमध्ये सत्तेत असलेल्या जदयूचे सहा आमदार फोडल्यामुळे जदयूमधून नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. ही नाराजी नितीश कुमार यांनीही व्यक्त केली होती. या घटनेमुळेच १७ आमदार नाराज असल्याचा दावा रजक यांनी केला आहे.