मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्य बजावले असून वर्षा राऊत यांना आता 5 जानेवारीला ईडीसमोर हजर व्हावे लागणार आहे. त्यावरून ऐन थंडीच्या दिवसांत राज्यातील राजकरण चांगलेच तापले आहे.
संजय राऊतांचे भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज
त्यानंतर भाजपवर टीका करण्याची एकही संधी संजय राऊत हे सोडत नाही आहेत. भाजपवर शिवसेनेने दैनिक ‘सामना’तून जहरी बाण डागल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करून समझनेवाले को इशारा काफी है! असे सांगत भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज दिले आहे. गोदी मीडियामधील कमळे अचानक फुलायला लागली आहेत. खास करून माझ्या कुटुंबाला ईडीची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यावर. जनतेला माहीत आहे, की राजकीय पोपट कसे राजकीय हेतूसाठी वापरले जातात. माझ्या कुटुंबाचे नाव पीएमसी आणि एचडीआयएल स्कॅममध्ये विनाकरण गोवण्यात आल आहे. मी त्यांना आव्हान देतो की पुराव्यानिशी ते सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर करवाईला तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है!’, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज दिले आहे.
जय महाराष्ट्र!!@BJP4India @KiritSomaiya @AmitShah @AUThackeray @OfficeofUT pic.twitter.com/JHOFXlfB8t
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 30, 2020
ईडीने खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावल्यामुळे राज्यात रान पेटले आहे. 29 डिसेंबरला वर्षा राऊत यांना ईडीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण त्या चौकशीसाठी हजर न झाल्यामुळे ईडीने त्यांना नवे समन्स बजावले आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात येत्या 5 जानेवारीला हजर राहावे, असे वर्षा राऊत यांना सांगण्यात आले आहे.
यापूर्वी प्रवीण राऊत आणि त्यांच्या पत्नीची चौकशी झाली आहे. आता केवळ वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवणे शिल्लक असल्याचे ईडीच्या समन्समध्ये सांगण्यात आले आहे. दुसरीकडे संजय राऊत आता कायदेशीर सल्ला घेत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची सेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी सामना ऑफिसमध्ये भेट घेतली होती.