पुण्यात उद्या Home Delivery वरही निर्बंध; मनपा आयुक्तांनी जाहीर केली नवी नियमावली


पुणे – राज्यामध्ये कोरोनाचे संकट पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारने खबरदारीच्या दृष्टीने ३१ जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील असे जाहीर केले असून मिशन बिगीन अंतर्गत राज्य सरकारने निर्बंध शिथील केले असले तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. मुंबई लोकलचाही यामध्ये समावेश आहे. लवकरच मुंबई लोकल सुरु होईल, असे सांगितले जात असले तरी याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या घोषणेनंतर पुण्याच्या आयुक्तांनीही लगेचच एक पत्रक जारी करत या मिशन बिगीन अगेनसोबतच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी म्हणजेच ३१ डिसेंबरसाठी नियमावली जारी केली आहे. विशेष म्हणजे ११ वाजल्यानंतर संचारबंदीची घोषणा करण्यात आली असतानाच ३१ डिसेंबर रोजी पुण्यामध्ये हॉटेलमधून येणारी होम डिलिव्हरीही केवळ पावणे अकरापर्यंत सुरु राहणार असल्याचे या नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

आज एक आदेश पुण्याचे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केला असून त्यांनी यामध्ये ३१ डिसेंबरची नियमावलीसंदर्भातील दहा मुद्द्यांची माहिती दिली आहे. पुण्यामध्ये ३१ डिसेंबर रोजी कोणत्या गोष्टी कधीपर्यंत सुरु राहतील तसेच नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत. यापैकी पाचवा मुद्दा हा होम डिलिव्हरीसंदर्भात आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरापर्यंतच पुणे महानगरपालिका श्रेत्रातील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ तसेच बार सुरु राहणार आहेत. रात्री पावणे अकराला सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ बंद होतील. त्याचप्रमाणे होम डिलिव्हरीची सुविधाही पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार असल्याचे या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून आज सकाळीच ३१ जानेवारी २०२१ पर्यंत लॉकडाउन वाढण्यासंदर्भातील अधिकृत आदेश प्रसिद्द करण्यात आला. राज्य सरकार कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचे यामध्ये त्यांनी सांगितले आहे. तसेच राज्यातील लॉकडाउन कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवत असल्याची माहिती दिली आहे. याआधी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स ३१ जानेवारीपर्यंत लागू राहतील असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. यासोबतच याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत.