ब्रिटनच्या विमानांना ७ जानेवारीपर्यंत भारतात नो एंट्री


नवी दिल्ली: कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे ७ जानेवारीपर्यंत ब्रिटन आणि भारत यांच्यातील हवाई वाहतूक बंदी कायम असेल. सरकारने याआधी ३१ डिसेंबरपर्यंत हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला होता. पण ही बंदी आता वाढवण्यात आली आहे.

कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळून आल्यामुळे २१ डिसेंबरला केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. भारताकडे ब्रिटनहून येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. ३१ डिसेंबरपर्यंत हा निर्णय लागू होता. पण नव्या स्ट्रेनचा धोका कायम असल्यामुळे या बंदीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता भारत आणि ब्रिटनमधील हवाई वाहतूक ७ जानेवारीपर्यंत बंद असेल.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन आता भारतात हातपाय पसरत असल्याचे दिसू लागले आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये आढळून आला आहे. याआधी काल दिवसभरात देशाच्या विविध भागांमध्ये ६ जणांना नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आरोग्य विभागाची धाकधूक वाढली आहे. त्यातच ब्रिटनहून आलेल्या अनेक प्रवाशांशी संपर्क होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.