ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक अजब घटना घडली असून थेट म्हशीच्या मालकाला रस्त्यावर पडलेल्या शेणामुळे तब्बल १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे समोर आले आहे. हा दंड ग्वाल्हेर महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे.
मध्य प्रदेश; नव्या रस्त्यावर म्हशीने घाण केल्यामुळे मालकाला तब्बल १० हजारांचा दंड
सध्या सोशल मीडियावर ग्वाल्हेर महानगरपालिकेकडून ठोठावण्यात आलेल्या दंडाची पावती तुफान व्हायरल झाली आहे. एका नवीन रस्त्याचे ग्वालियर महानगरपालिकेकडून काम सुरू होते. बेताल सिंग नामक डेअरी मालकाच्या एका म्हशीने त्यावेळी रस्त्यावर घाण केली. नेमक्या याचवेळी महापालिकेचे आयुक्त रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तिथे पोहोचले. म्हशीचे शेण नव्या रस्त्यावर पडल्याचे दिसले आणि म्हशीच्या मालकाला दंड ठोठावण्याचा आदेश दिला.
ग्वालियर महानगरपालिकेचे अधिकारी मनीष कनोजिया यांनी यासंदर्भात बोलतना सांगितले की, ग्वाल्हेर शहरामधील अनेक ठिकाणी रस्त्याची कामे काम सुरू आहेत. रस्त्यावर आणि शहरातील इतर ठिकाणी कचरा होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर रस्त्यावर घाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करत त्यांना दंड ठोठावला जात आहे. तसेच शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबतही जागरुकता करण्याचे काम सुरू आहे.
बेताल सिंगच्या म्हशी रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्यावर फिरत होत्या. त्यांना सांगूनही त्याने म्हशींना हटवले नाही. आयुक्तांच्या आढावा दौऱ्यावेळी म्हशीचे शेण आढळून आले. तेव्हा बेताल सिंगविरोधात कारवाई करत १० हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले. डेअरी मालकानेही चूक मान्य केली असून, महापालिकेच्या कार्यालयात दंड भरल्याची माहिती मिळाली आहे.