ब्रिटनने दिली एस्ट्राजेनका-ऑक्सफर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता


ब्रिटन – सध्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे संकट जगावर ओढावलेले असून ते सकंट आता अजूनच गडद होऊ लागले असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राजेनेकाकडून तयार करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करत असलेल्या ब्रिटनने मान्यता दिली आहे. यासोबतच ब्रिटन कोरोना लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

ब्रिटनमध्ये सध्या कोरोनाचा नवा स्ट्रेन मोठ्या प्रमाणात फैलावत असल्यामुळे त्यांच्यावर अनेक देशांनी निर्बंध आणले आहेत. सध्या कोरोनाशी ब्रिटन लढा देत असतानाच लसीला मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, औषधे आणि हेल्थकेअर उत्पादने नियामक प्रशासनाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी/ अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीसंबंधी केलेल्या शिफारसीला सरकारने मान्यता दिली आहे.

जगभरात जवळपास १७ लाख लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. चीनमधीन वुहान येथून सुरु झालेल्या कोरोनामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली. सध्या इतर देश कोरोना संकटामधून बाहेर पडत असताना ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत मात्र कोरोनाच्या नव्या विषाणूंनी थैमान घातला आहे. हा नवा प्रकार जास्त वेगाने परसत असल्याचे सरकार आणि शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांनी ब्रिटनसोबतचा व्यापार आणि विमानसेवा बंद केली आहे. अ‍ॅस्ट्राजेनेका आणि कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या इतर कंपन्यांनी कोरोनाचा नवा प्रकार किती प्रभावी आहे याचा अभ्यास करत असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी कोरोनाची लस नव्या प्रकारावरही उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.