ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी आता सहप्रवाशांवरही कारवाई होणार!


ठाणे : अवघ्या काही तासांवर 2021 या नववर्षाचे स्वागत येऊन ठेपले आहे. ठाणे वाहतूक पोलीस याच पार्श्वभूमीवर अलर्ट झाले असून वाहतूक विभागाचे मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्यांवर बारीक लक्ष असणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांविरोधात 25 डिसेंबरपासून कारवाई सुरु केली आहे. सुमारे 415 मद्यपी वाहनचालकांवर पहिल्या चार दिवसांत विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये कारवाई झाली आहे.

ही कारवाई 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आणखी तीव्र केली जाणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत त्यासाठी ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारुन प्रत्येक वाहनचालकाची तपासणी केली जाणार आहे. मोटार वाहन कायद्यान्वये केवळ मद्यपी वाहनचालकच नव्हे तर, वाहनांतील सहप्रवासीसुद्धा दोषी ठरतात. त्यांच्याविरोधातही यंदा कारवाई केली जाणार असल्यामुळे कुणीही मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून वाहतूक पोलिस कोरोना संक्रमणाचा धोका कायम असल्यामुळे मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करत नव्हते. ब्रेथ एनलायजरच्या सहाय्याने तपासणी शक्य नसल्याने मद्यपी वाहनचालकांचा बेदरकारपणा वाढू लागला आहे. त्यामुळे रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत वाढ होण्याचा धोका आहे.

5 जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू असल्याने हॉटेल, बार आणि अन्य ठिकाणी रात्री 11 नंतर पार्ट्यांवर बंदी आहे. परंतु, अनेकजण आपापल्या घरांमध्ये किंवा खासगी ठिकाणांवर पार्टी केल्यानंतर नववर्ष स्वागताचा जल्लोष करण्यासाठी बाहेर पडण्याची दाट शक्यता असल्यामुळे होणारे संभाव्य अपघात आणि गैरप्रकार टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत. वाहतूक पोलिसांची त्यानुसार मद्यपी वाहनचालकांविरोधातील कारवाई तीव्र करण्यासाठी विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे.

मद्यपी वाहनचालकांना मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 185 अन्वये दोन हजार रुपये दंड किंवा सहा महिने कैद अशी शिक्षा होऊ शकते. पुन्हा-पुन्हा हा गुन्हा केल्यास तीन हजार रुपये दंड आणि दोन वर्षे कारावास अशा शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. तसेच, याच कायद्याच्या कलम 188 मध्ये मद्य प्राशन केलेल्या व्यक्तीला वाहन चालवण्यास उद्युक्त केल्याचा ठपका ठेवत सहप्रवाशांवरही कारवाई होऊ शकते. त्या कलमाचा आधार यंदा पोलीस घेणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये किंवा मद्यपी वाहनचालकासोबत प्रवास करु नये, असे आवाहन उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. रात्री अकरानंतर घराबाहेर पडल्यास संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. नववर्षात अशी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी रात्री कुणीही घराबाहेर पडू नये, असेही आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.