6 मार्च 2021ला प्रसिद्ध आंगणेवाडी श्री भराडीदेवीची यात्रा


सिंधुदुर्ग – कोकणवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या भराडी देवीची जत्रा यंदा 6 मार्च 2021 रोजी भरणार आहे. आंगणेवाडीतील या देवीची नवसाला पावणारी देवी अशी ख्याती देशा-परदेशात पसरली असल्यामुळे मुंबई, पुणे शहरातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी दरवर्षी भरणार्‍या या देवीच्या दीड दिवसांच्या यात्रेसाठी कोकणात दाखल होतात. पण यंदा सगळीकडे सावट पसरलेले असल्यामुळे हा वार्षिकोत्सव यंदा मर्यादित स्वरुपाचा होणार असून यावेळी फक्त आंगणे कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडेल अशी माहिती आंगणे कुटुंबीयांकडून देण्यात आलेली आहे.आंगणेवाडीची जत्रा ही कोकणातील केवळ आंगणे या गावातील असते. पण त्याची ख्याती सर्वदूर पसरली असल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात भाविक येतात.

पण यंदा सगळ्या भाविकांना या यात्रेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहभागी होता येणार नसल्यामुळे भविकांमध्ये नक्कीच नाराजी पसरेल. त्याचबरोबर भाविकांच्या गैरसोयीसाठी आंगणे कुटुंबियांनी दिलगिरी व्यक्त केली असून आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून भराडी देवीस आपले सांगणे सांगावे आणि तिथूनच नमस्कार करावा, आई भराडी माता तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल ,असे आवाहन ही आंगणे कुटुंबियांकडून करण्यात आलेले आहे.

पहाटेपासूनच श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी सुरुवात होते. कमी वेळात भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून भाविकांसाठी आंगणे कुटुंबियांकडून विशेष सुविधा उपलब्ध करुन देत असते. पण यंदा कोरोनाच्या सावटामुळे हा उत्सव मर्यादित लोकांमध्येच पार पडणार आहे.