ईडीसमोर हजर होण्यासाठी वर्षा राऊत यांनी मागितला ५ जानेवारीपर्यंत वेळ


मुंबई – अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवून २९ डिसेंबर म्हणजेच आज चौकशीसाठी बोलावले होते. त्यांनी ही नोटीस पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी पाठवण्यात आली आहे. दरम्यान वर्षा राऊत यांनी ईडीसमोर हजर होण्यासाठी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहिती संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

संजय राऊत यांना वेळ वाढवून मागितली आहे का? असे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, हो वेळ वाढवून मागितली आहे. एवढे मोठे प्रकरण आहे. ज्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. सध्या आपल्या देशात काहीच सुरु नाही. सध्या ही ५० लाखांची एकच केस त्यांच्याकडे आहे. १२० जणांची यादी मी दिल्यानंतर कदाचित ईडीकडे खूप काम येईल.

अद्याप नोटीस मी पाहिलेली नाही. माझ्या नावावर नोटीस नसल्यामुळे नोटीस पाहण्याची मला गरज नाही. हे सगळे राजकारण कसे चालते याची मला चांगली माहिती आहे, त्यामुळे हे सुरु राहू दे आम्ही उत्तर देऊ, असेही त्यांनी सांगितले. लपवण्यासाऱखे आमच्याकडे काही नाही. ही माहिती कागदपत्रांमध्ये उघड असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

आम्हाला जी गोष्ट लोकांसमोर ठेवायची होती, ती पत्रकार परिषदेत सांगितली आहे. अजून काही गोष्टी आहे त्यादेखील सांगेन. जे आम्ही सांगितले आहे, ते ईडी आणि देशासाठी मार्गदर्शक असेल, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. सरकारच्या तपास यंत्रणेकडून एखादा कागद कुटुंबाला आला असेल तर त्याचा आदर करणे आमचे कर्तव्य आहे. यामागे राजकारण असूनही त्याचा आदर करतो. सध्या या संस्थांना काही काम नाही. सरकार विरोधक आणि खासकरुन भाजप विरोधक जे आहेत, त्यांचा कशा पद्दतीने मानसिक तसेच इतर छळ करता येईल हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आम्ही त्या राष्ट्रीय कर्तव्याचाही आदर करतो. त्यांना हुकूम मानायचा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

ईडीची मला कीव येते. कधी काळी यांना फार प्रतिष्ठा होती, ती आता त्यांना मिळत नाही. सरकारी गुलाम त्यांना मानले जाते हे खेदजनक असल्याचे संजय राऊत यांनी म्हणाले. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. पण ज्यांच्याकडे लपवण्यासारखे आहे ते भाजपमध्ये दाखल होतात, असा टोलाही त्यांनी लगावला.