ग्रामपंचायत निवडणुकीत दडपशाही आणि दमबाजी करणाऱ्यांना रोहित पवारांनी भरला दम


नगर : कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उशिरा का होईना ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावांना बक्षीस म्हणून निधी देण्याच्या योजनेत उडी घेतली आहे. ३० लाखांचा निधी निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावाला देण्याची घोषणा करतानाच त्यांनी निवडणुकीत दडपशाही आणि दमबाजी करणाऱ्यांनाही दम भरला आहे. त्याचबरोबर असे प्रकार जर कोणी केले तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा, असा सज्जड दमच पवार यांनी दिला आहे.

सध्या राज्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या अंतिम मुदत आहे. ठिकठिकाणच्या आमदारांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेत अशा गावांना स्थानिक विकास निधीतून २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी घोषणा केल्यानंतर अल्पावधीतच राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांनी आपापल्या भागात अशी घोषणा केली.

त्यानुसार अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत आहेत. अशी घोषणा संवेदनशील आमदार म्हणून ओळख असलेल्या रोहित पवार यांनी देखील अशी मागणी त्यांच्या मतदारसंघातून होत होती. बहुतांश उमेदवारांचे अर्ज भरून झालेले असताना आणि शेवटचे दोनच दिवस बाकी असताना पवार यांनी अखेर ही घोषणा केल्यामुळे निवडणूक ज्या गावांना बिनविरोध करायची आहे, त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी करावी लागणार आहे. कर्जत तालुक्यातील ५६ तर जामखेड तालुक्यातील ४९ गावांच्या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यातील बिनविरोध निवडणूक होणाऱ्या गावांना आमदार निधीतून, सीएसआर फंडातून ३० लाखांचा विकास निधी देण्याची घोषणा पवार यांनी केली आहे.

पवार आणि भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघात चुरस आहे. बहुतांश गावांत अशाच चुरशीने निवडणुका लढविल्या जाण्याची शक्यता असल्यामुळे गैरप्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन बक्षीस म्हणून निधी जाहीर करताना आमदार पवार यांनी तंबीही दिली आहे. कोणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य काही मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गय केली जाणार नाही. असा कोणताही प्रकार कोणी करू नये. अन्यथा, लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशाराच पवार यांनी दिला आहे.