रजनीकांत यांनी राजकीय पक्ष सुरु करण्याचा विचार घेतला मागे


चेन्नई – दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत लवकरच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत नव्या पक्षाची घोषणा करतील याकडे सर्वांचं लक्षा लागले असतानाच रजनीकांत यांनी मोठा निर्णय घेतला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राजकीय पक्ष सुरु करण्याचा विचार रजनीकांत यांनी मागे घेतला आहे. रजनीकांत यांनी ही घोषणा तीन पानांचे पत्र ट्विट करत केली आहे. त्यांनी पक्ष स्थापन करत नसल्याबद्दल माफीदेखील मागितली आहे.

आपण राजकीय पक्ष सुरु करणार नसून आपली बिघडलेली प्रकृती हा देवाने दिलेला इशारा असल्याचे म्हटले आहे. यावेळी आपल्यावर विश्वास ठेवलेल्यांना आपण बळीचा बकरा झालो, असे वाटू नये असे सांगताना बिघडलेली प्रकृती हा एक इशारा असल्याचा उल्लेख रजनीकांत यांनी केला आहे. त्याचबरोबर रजनीकांत यांनी म्हटले आहे की, माझ्या प्रकृतीसंबंधी ज्या काही घडोमाडी गेल्या काही दिवसांत झाल्या त्या मी देवाचा इशारा समजतो आणि २०२१ तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार रद्द करत आहे.

नुकतीच प्रकृती बिघडल्याने हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात रजनीकांत यांना दाखल करण्यात आले होते. त्यांना रक्तदाब आणि थकव्याचा त्रास जाणवत होता. त्यांना २७ डिसेंबरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.