ब्रिटनहून पुण्यात परतलेले १०९ प्रवासी बेपत्ता


पुणे – ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकारमुळे दहशत निर्माण झालेली असतानाच त्याठिकाणी दुसरी लाट आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेत आलेला कोरोनाचा नवा प्रकार अधिक प्रभावशाली असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे काही दिवसांसाठी ब्रिटनमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे इतर देशांनी काळजी घेण्यास सुरुवात केली असून ब्रिटनच्या वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. अशातच पुणेकरांची चिंता वाढवणारी एक माहिती समोर आली आहे.

ब्रिटनहून पुण्यात परतलेल्या ५४२ पैकी १०९ प्रवाशांसोबत अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. या प्रवाशांनी नमूद केलेल्या पत्ता आणि फोन क्रमांकावर संपर्क होत नसल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यातील अनेकांचे फोन बंद असून काही जण दिलेल्या पत्यावर नाही आहेत. पुणे पोलिसांना ही माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. सध्या या १०९ जणांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

२५ नोव्हेबंरनंतर ब्रिटन किंवा युरोपातील देशांमधून आलेल्यांचे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, आणि पुणे ग्रामीण अशी क्षेत्रांप्रमाणे वेगवेगळी वर्गवारी करण्यात आली. आपल्याकडे ३०० जणांची यादी आहे. २७० जणांचे आरटीपीसीआरदेखील करण्यात आले आहेत. पण काही नावांचा खुलासा होत नाही आहे. यासंबंधी पोलिसांकडे महापालिकेने पत्र सोपवले असून तक्रार दिली असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलधीर मोहोळ यांनी दिली आहे.