काश्मीरच्या मुलीचा जो बायडन यांच्या ‘डिजिटल स्ट्रॅटजी टीम’मध्ये समावेश


वॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या डिजिटल स्ट्रॅटजी टीमची घोषणा अमेरिकेच्या ‘व्हाइट हाऊस’मध्ये करण्यात आली. मूळच्या काश्मीर येथे जन्म झालेल्या आयशा शहा हिची यात वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आयशा शहा हिच्याकडे व्हाइट हाऊसमध्ये डिजिटल स्ट्रॅटजी टीममध्ये पार्टनरशिप मॅनेजर पदाची जबाबदारी असणार आहे. रॉब फ्लेहर्टी बायडन यांच्या या डिजिटल टीमचे नेतृत्व करणार आहेत.

याआधी आयशा शहा हिने बायडन-हॅरिस यांच्या निवडणूक प्रचारातही डिजिटल पार्टनशिप मॅनेजर म्हणून काम पाहिले होते. काश्मीरमध्ये जन्मलेली आणि सध्या अमेरिकेच्या लुझियानामध्ये स्थायिक असलेली आयशा सध्या स्मिथसोनियन संस्थेसाठी अॅडव्हान्समेंट स्पेशालिस्ट म्हणून काम करते. आयशाने याआधी जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या कॉपोरेट फंडावर सहाय्यक व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे. तिने त्यावेळी राष्ट्रपतींच्या स्मारकाच्या विस्ताराला पाठिंबा दिला होता. बुय येथे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन स्पेशलिस्ट म्हणूनही आयशाने काम पाहिले आहे.

आयशासह इतर विविध पदांसाठी तज्ज्ञ मंडळींचा रॉब फ्लेहर्टी नेतृत्व करत असलेल्या डिजिटल स्ट्रॅटजी टीममध्ये समावेश आहे. यात ब्रेंडन कोहेन (प्लॅटफॉर्म मॅनेजर), महा घंदौर (डिजिटल पार्टनरशिप मॅनेजर), जोनाथन हेबर्ट (व्हिडिओ डायरेक्टर), जैमे लोपेझ (डायरेक्टर ऑफ प्लॅटफॉर्म), कारहाना मॅगवुड (क्रिएटिव्ह डायरेक्टर), अॅबी पिट्झर (डिझाइनर), ऑलिव्हिया रायसनर (ट्रॅव्हलिंग कंटेन्ट डायरेक्टर), रेबेका रिंकेविच (डेप्यूटी डायरेक्टर ऑफ डिजिटल स्ट्रॅटजी), ख्रिश्चन टॉम (डेप्यूटी डायरेक्टर ऑफ डिजिटल स्ट्रॅटजी) आणि कॅमेरुन ट्रिमबल (डायरेक्टर ऑफ डिजिटल एन्गेंजमेंट) यांचा समावेश आहे.