घरच्याघरी वापरण्याजोगे ‘स्किन टोनर्स’


सध्याच्या काळात आपल्यातील गुणांएवढेच महत्व आपल्या दिसण्याला, अर्थात बाह्य व्यक्तिमत्वाला आहे. आपल्या व्यक्तिमत्वात आपल्या त्वचेच्या लाकाकीचा मोठा वाटा आहे. त्वचेच्या तजेलदारपणाचे महत्व केवळ बाह्य सौंदर्यासाठीच नाही तर ते उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. तजेलदार त्वचेमुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास आणि रुबाबदारपणा निर्माण होण्यास मदत होते. सध्याच्या धावपळीच्या काळात मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार, जेवण-खाणाच्या आणि झोपण्याच्या अनियमित वेळा, दुचाकीवर प्रवास करण्यामुळे लागणारे ऊन, धूळ या सगळ्याचा परिणाम एकूणच आरोग्यावर, पर्यायाने त्वचेच्या निरोगीपणावर होतो.

या सर्व बाबी मार्गी लावण्याबरोबरच त्वचेच्या आरोग्यासाठी स्वतंत्रपणे वेळ आणि लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अनेकांना आपल्या त्वचेची नैसर्गिक चमक गमावल्याचा अनुभव येतो. अशा वेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी उपपयोजना करणे गरजेचे आहे. तजेलदार त्वचा प्राप्त करणे फारसे अवघड नाही. त्यासाठी स्वतःवर, अर्थात आपल्या त्वचेवर प्रेम करणे, तिचे थोडेसे लाड करणे आवश्यक असते. स्वच्छता आणि मॉइश्चरायझिंग हे त्वचा निरोगी राखण्याचे प्राथमिक उपाय आहेत. मात्र, एवढेच पुरेसे नाही. सौंदर्य तज्ज्ञांना विचारलं तर ते टोनर्सचे महत्व सांगतील. टोनर्स त्वचेच्या आतून खोलवरुन स्वच्छता करतात आणि त्वचेला एकसंध करण्यास मदत करतात.

बाजारपेठेत त्वचेसाठी अनेक प्रकारचे टोनर्स सहज उपलब्ध आहेत. मात्र, अनेकदा त्यात रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. रसायने ही त्वचेसाठी घटक ठरतात. ते टाळण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून आपण घरी सहजपणे टोनर्सचे काही प्रकार तयार करू शकतो. हे स्किन टोनरचे ३ प्रकार असे आहेत की जे सहज घरच्याघरी तयार करता येतात-

१) ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर आपल्या त्वचेचा ‘पीएच’ संतुलित करून त्वचेच्या टोनिंगला मदत करते. त्यामुळे त्वचेचे संसर्गापासून जंतू, धूळ आणि प्रदूषण यापासून संरक्षण होते. त्वचेवरील छिद्र निघून जातात. तेलकटपणा निघून जातो. मुरुमांपासून बचाव करण्यास मदत करते.

वापरण्याची पद्धत: ऍपल सायडर व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात घेऊन चांगले मिसळा. हे व्हिनेगर आपण बदाम, तीळ अथवा कोणत्याही तेलातही घालू शकतो. हे मिश्रण आपल्या चेहेरा आणि गळ्याला लावा. पाच मिनिटांसाठी तसेच ठेऊन नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

२) काकडी आणि कोरफड
काकडी आणि कोरफडीचे मिश्रण त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे. यामुळे त्वचेला उत्तमप्रकारे तजेला प्राप्त होऊ शकतो. कोरफड आपल्या त्वचेचे घटक अशा अतिनील किरणांपासून संरक्षण करते. तर काकडी त्वचेला मुलायमपणा प्रदान करते. त्वचेचा कोरडेपणा दूर करते. त्यामुळे त्वचा टवटवीत आणि तजेलदार दिसते.

वापरण्याची पद्धत: पाव कप काकडी पेस्ट किंवा रस आणि एक चमचा कोरफड एकत्र करून चांगले मिसळा हे मिश्रण त्वचेवर, चेहेरा आणि गळ्यावर लावा. थोड्या वेळानंतर कापसाच्या साहाय्याने त्वचा, चेहेरा, गळा साफ करा आणि थंड पाण्याने धुवा.

३) थंड गुलाबपाणी
गुलाबपाणी हा मन आणि शरीराला टवटवीतपणा देणारा पदार्थ आहे. आपण आपल्या त्वचेवर गुलाब पाणी लावले की त्याचा सुगंध त्वरित आपल्याला ताजेतवाने करून टाकतो. गुलाबपाणी त्वचेला एकसंध करण्यास मदत करते. तसेच त्वचेला मुलायमपणा प्रदान करते. ‘पीएच’ पातळी संतुलित करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

वापरण्याची पद्धत: चेहेरा स्वच्छ करून थंडगार गुलाबपाणी आपल्या त्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही