बॉक्सिंग डे कसोटीत ८ गडी राखून ऑस्ट्रेलियावर मात, मालिकेतही बरोबरी


मेलबर्न – मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाने विराट कोहली, शमी यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही आश्वासक मारा करत धडाकेबाज विजयाची नोंद केली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेचे पहिल्या डावातील शतक आणि भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा ही टीम इंडियाच्या विजयाची वैशिष्ट्य ठरली.

ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ६ बाद १३३ पर्यंत मजल मारत दोन धावांची आघाडी मिळवली होती. भारतीय गोलंदाजांना सुरुवातीच्या सत्रात कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने चांगलेच झुंजवले. अखेरीस बुमराहने कमिन्सला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिल्यानंतर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर ठराविक अंतराने कॅमरुन ग्रीनही बाद झाला. ४५ धावांची त्याने खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा डाव सातव्या विकेटसाठी ग्रीन आणि कमिन्स यांच्यातील ५७ धावांच्या भागीदारीमुळे सावरल्यानंतर नॅथन लियॉनही सिराजच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क जोडीने भारतीय गोलंदाजांना अखेरपर्यंत झुंजवत संघाला द्विशतकी टप्पा गाठून दिला. अखेरीस अश्विनने जोश हेजलवूडचा त्रिफळा उडवत कांगारुंचा दुसरा डाव २०० धावांवर संपवला. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ३, बुमराह-आश्विन आणि जाडेजा या अनुभवी त्रिकुटाने प्रत्येकी २-२ तर उमेश यादवने १ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल दुसऱ्या डावातही अवघ्या ५ धावा काढून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या चेतेश्वर पुजारालाही आपली छाप पाडता आली नाही. ३ धावा काढून पुजारा कमिन्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेने काही सुरेख फटके लगावत भारतीय संघावरच दडपण कमी केल्यानंतर शुबमन गिलनेही काही चांगली फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप आणले. अखेरीस रहाणे-गिल जोडीने अधिक पडझड न होऊ देता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.